पावस : लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे आणि ठेकेदाराच्या नाकर्तेपणामुळे गावडेआंबेरे सातपऱ्या पुलाचे काम गेली तीन वर्षे उलटली तरी अद्याप पूर्णत्वाला जात नसल्याने परिसरात नाराजीचा सूर निघत आहे.
पावस ते गावडेआंबेरे खानवलीमार्गे विटा पेठ हा राज्यमार्ग असल्याने या मार्गावर रस्त्याची रुंदीकरण मोठ्या प्रमाणात करण्यात आले आहे. या मार्गावरील अनेक लहान-मोठी कामे पूर्ण झाले आहेत. गावडेआंबेरे सात पऱ्यापुलासाठी अनेक वर्षांची मागणी लक्षात घेऊन पावसाळ्यात होणारी वाहतुकीची कोंडी लक्षात घेता आठ कोटींचा निधी मंजूर झाला होता. त्यानंतर पुलाचे काम सुरू झाले. मात्र तीन वर्षे झाली तरी अद्यापही या पुलाचे काम पूर्णत्वास गेलेले नाही. अपूर्ण कामामुळे यावर्षीही पावसाळ्यामध्ये वाहतूक विस्कळीत होणार आहे. या पुलाच्या दोन्ही बाजूच्या भरावाचे काम अर्धवट आहे.
या संदर्भात मावळंगे येथील सामाजिक कार्यकर्ते अनिल बिर्जे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, ज्याप्रमाणे गेले अनेक वर्षे मुंबई-गोवा मार्गावरील संगमेश्वर ते लांजा हे चौपदरीकरणाचे काम रखडले आहे, तसेच गावडेआंबेरे सातपऱ्याचे काम अर्धवट आहे. अद्याप ते पूर्ण होण्याची लक्षणे दिसत नाहीत. त्यामुळे ग्रामस्थांसह वाहनचालकांचीही गैरसोय होत आहे.
प्रशासनान लक्ष घालावे…
सातपऱ्या पुलाचे काम तीन वर्षे उलटून गेली तरी अद्याप अपूर्ण आहे. त्यामुळे यंदाच्या पावसाळ्यातही वाहतूक विस्कळीत होऊन कोंडीची मोठी समस्या निर्माण होण्याचा धोका आहे. याकडे संबंधित प्रशासनाने लक्ष घालून पुलाचे काम मार्गी लावावे, अशी मागणी भागातील नागरिकांतून होत आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:33 AM 03/Feb/2025














