रत्नागिरी : केंद्र व राज्य शासनाच्यावतीने शासकीय रुग्णांचा आरोग्य सुविधांचा दर्जा वाढावा व नागरिकांना दर्जेदार आरोग्य सुविधा मिळाव्यात, या हेतूने आरोग्य संस्थांना कायाकल्प पुरस्काराने गौरवण्यात येते. यावर्षातील कायाकल्प पुरस्कारांची घोषणा मंगळवारी आरोग्य विभागाच्यावतीने करण्यात आली आहे. यामध्ये रत्नागिरी जिल्ह्याने आपली छाप पाडत दोन उपजिल्हा रुग्णालय, दोन ग्रामीण रुग्णालय, २३ प्राथमिक आरोग्य केंद्रांसह ७६ आरोग्य उपकेंद्राना हा पुरस्कार जाहीर झाला आहे.
केंद्र आणि राज्य शासनाच्या वतीने देण्यात येणाऱ्या २०२३-२४ या वर्षातील कायाकल्प पुरस्कारांची घोषणा आरोग्य विभागाच्यावतीने करण्यात आली आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये, तसेच जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. भास्कर जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली उल्लेखनीय कामगिरी करून रत्नागिरी जिल्ह्यातील २ उपजिल्हा रुग्णालय, २ ग्रामीण रुग्णालयासह २३ प्राथमिक आरोग्य केंद्र, ७६ आरोग्य उपकेंद्रानी हा पुरस्कार पटकावला आहे. या पुरस्कार प्राप्त रुग्णालय व आरोग्य केंद्र तसेच उपकेंद्रांना रोख रक्कम देऊन गौरवण्यात येणार आहे.
केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागाने १५ मे २०१५ रोजी ‘स्वच्छ भारत मिशन’चा विस्तार म्हणून’ कायाकल्प पुरस्कार योजना’ सुरू केली आहे. सार्वजनिक आरोग्य सेवा सुविधांमध्ये स्वच्छता, कचरा व्यवस्थापन आणि संसर्ग नियंत्रण पद्धती सुधारणे आणि आरोग्य सुविधांना प्रोत्साहन देणे हे उपक्रमाचे उद्दिष्ट आहे. महाराष्ट्र राज्यामध्ये आरोग्य संस्थांचे मोठे जाळे असून त्या माध्यमातून ग्रामीण जनतेला विशेषतः गरीब व जोखमीच्या लोकांना गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा उपलब्ध करून दिली जाते.
योजनेची काही प्रमुख उद्दिष्टे
लोक/कर्मचारी सहभागातून शासकीय आरोग्य संस्था स्वच्छ व सुसज्ज करणे. राज्य शासनाच्या रुग्णालयातून गुणवत्तापूर्ण सेवा उपलब्ध करून देऊन त्याद्वारे जनतेचा शासनाच्या आरोग्य संस्थांवरील विश्वास वाढविणे व सर्व सार्वजनिक आरोग्य सेवेकडे सर्वांना आकर्षित करणे. शासकीय आरोग्य संस्थांमधून देण्यात येणाऱ्या सेवेची गुणवत्ता व परिणामकारकता वाढविण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करणे. रुग्णांचे आरोग्य सेवेच्या माध्यमातून समाधान करणे. शासकीय आरोग्य संस्थांमधील प्रसूतीचे प्रमाण वाढविणे. शासकीय आरोग्य संस्थांमधील बाह्य रुग्ण व आंतररुग्णांची संख्या वाढविणे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:48 AM 02/Oct/2024