पावस प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नूतन इमारतीचे काम संथगतीने

पावस : दोन वर्षांपूर्वी पावस प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीचे नूतनीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे; मात्र काम संथगतीने सुरू असल्यामुळे अद्याप पूर्ण होऊ शकले नसल्याने रुग्णांची गैरसोय होत असून तातडीने उर्वरित रखडलेले काम पूर्ण करावे, अशी मागणी होत आहे.

पावस प्राथमिक आरोग्य केंद्र इमारत चांगल्या तऱ्हेची व्हावी व रुग्णांना चांगली सेवा मिळावी याकरिता दोन वर्षांपूर्वी त्याच्या बांधकामाकरिता जिल्हा वार्षिक नियोजनातून चार कोटींचा निधी देण्यात आला होता. त्याचे भूमिपूजन होऊन कामाला सुरुवात झाली.

आतापर्यंत ९० टक्के बांधकाम पूर्णत्वाला गेलेले आहे. उर्वरित काम संथगतीने सुरू आहे. रुग्णांच्या आरोग्याच्या सोयीसुविधाच्यादृ‌ष्टीने सध्या वापरात असलेली इमारत अपुरी पडत असल्याने रुग्णांना गैरसोयीचे ठरत आहे. एक सुसज्ज इमारत तयार होत असताना त्याचे काम रखडल्याने परिसरामध्ये नाराजीचा सूर निघत आहे. कारण, सध्या कर्मचाऱ्यांच्या निवासाच्या ठिकाणी गेली दोन वर्षे रुग्णसेवा दिली जात आहे; मात्र सुसज्ज इमारत तयार झालेली असतानासुद्धा त्यामध्ये आवश्यक असणाऱ्या सुविधा आरोग्याच्यादृ‌ष्टीने तातडीने करणे गरजेचे असताना काम रखडले आहे, तरी तातडीने असलेले काम पूर्ण करून सुसज्ज इमारत रुग्णसेवेसाठी लोकार्पण करावे, अशी मागणी जोर धरू लागली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:31 AM 04/Feb/2025