गुहागर : ई-कचरा संकलित करण्याचा उमराठ ग्रामपंचायत ठराव

गुहागर : ग्रामस्थांनी ई-कचरा संकलन करावे, असा ठराव गुहागर तालुक्यातील उमराठ ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत केला आहे. ही सभा शनिवारी (ता. २५) उमराठ गोरिवलेवाडी अंगणवाडी सभागृहात सरपंच जनार्दन आंबेकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली.

ई-कचरा संकलन म्हणजे इलेक्ट्रॉनिक कचरा संकलन होय. आतापर्यंत खेडेगावातील ग्रामस्थांना विघटन न होणारा प्लास्टिक कचरा तसेच ओला व सुका कचरा याबाबत प्रामुख्याने माहिती होती; परंतु इलेक्ट्रॉनिक कचऱ्यासंबंधित फारसे लगेच लक्षात येत नव्हते. या बाबतीत सविस्तर माहिती उमराठचे ग्रामपंचायत अधिकारी सिद्धेश्वर लेंडवे यांनी ग्रामस्थांना समजावून सांगितली. इलेक्ट्रॉनिक कचऱ्यात विविध प्रकारचे सुटे भाग असतात जे उपकरणाच्या प्रकारानुसार वेगवेगळे असू शकतात. हे भाग मुख्यतः प्लास्टिक, धातू, काच तसेच विषारी घटकांनी बनलेले असतात. त्यामध्ये खालील भागांचा समावेश असतो. तसेच ई-कचरा संकलनाचे फायदेही सांगितले. पर्यावरण प्रदूषण कमी होते, ई-कचऱ्यातील अनेक भागांचा पुनर्वापर करता येतो. त्यामुळे नैसर्गिक संसाधनांची बचत होते.

घरात नादुरुस्त झालेली उपकरणे पडून राहिल्यामुळे अनावश्यक कचरा घरात जमा होतो. त्याची स्वच्छता राखली जात नाही. काही ई- उपकरण नादुरुस्त असली तरीही त्यातील बॅटरीमधून विद्युतप्रवाह सुरूच राहतो. विशिष्ट परिस्थिती निर्माण झाल्यास या बॅटऱ्यांचा स्फोट होऊन दुखापत होण्याची, आग लागण्याचा धोका असतो, अशी माहिती ग्रामस्थांना देण्यात आली. हा विषय लक्षात आल्यानंतर ई-कचरा संकलनाबाबत ठराव केला.

इलेक्ट्रॉनिक संबंधित जुन्या टाकावू वस्तू आपापल्या घरी जमा करून गोणीमध्ये भरून ठेवाव्यात. इतरत्र कुठेही टाकू नये, त्याची ग्रामपंचायतीमध्ये नोंद करावी म्हणजे ग्रामपंचायत एकत्रित संकलन करून तो ई-कचरा तालुक्याच्या ठिकाणी पुढील कारवाईसाठी पाठवून देण्यात येईल, असे ठरवण्यात आले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:43 AM 04/Feb/2025