मंडणगड : घाटातील नागमोड्या वळणांवर वाहतूक धोकादायक

मंडणगड : मंडणगड तालुक्यातील केळवत, शेनाळे, माहू, नारगोली, तुळशी, उमरोली, चिंचघर, घोसाळे, कडूक, सावरी, निगडी, भामघर चौकी, घुमरी या गावातील घाटांमध्ये धोकादायक वळणावर संरक्षक भिंती नसल्यामुळे घाटमार्गने प्रवास करणाऱ्या वाहनांची सुरक्षा रामभरोसेच आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, पंचायत समिती बांधकाम विभाग, पंतप्रधान ग्रामसडक योजना कार्यालय यांनी या समस्या’कडे कायम दुर्लक्ष केले आहे.

घाटात अपघात झाल्यानंतर संरक्षक भिंतीचा विषय यंत्रणांकडून चिघळला जातो; मात्र त्यावर अंमलबजावणी होत नाही मंडणगड तालुक्यातील सर्व घाटांमध्ये पन्नासहून अधिक ठिकाणी तातडीने नव्याने संरक्षक भिंती उभारणे गरजेचे आहे. त्याशिवाय घाटातील सर्वच नागमोड्या वळणांवर लोखंडी रेलिंग आवश्यक आहेत. पूर्वी जागोजागी असलेल्या विपुल वनसंपदेमुळे अपघात झाला तरीही समस्येची तीव्रता तितकीशी जाणवत नव्हती; मात्र गेल्या दोन दशकात घाटमार्गांना लागून असलेल्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड झाल्यामुळे अपघातामधील आता वाहने थेट दरीत जात आहेत. घाटातील सुरक्षेसाठी उपाययोजना करा, अशी मागणी वर्षानुवर्षे नागरिक करत आहेत. त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. यंत्रणा गंभीर अपधात किंवा जीवितहानीची प्रतीक्षा अधिकारीवर्ग करत आहे की, काय असा प्रश्न तालुकावासीयांमधून व्यक्त केला जात आहे.

सद्यः स्थितीत तालुक्यातील घाटमार्गातील सर्वच रस्ते तीन ते चार दशकांपूर्वीचे आहेत. या रस्त्यावरून वाहतूक वाढली असली तरीही त्यामध्ये कोणतीही सुधारणा करण्यात आलेली नाही. अनेक वेळा रस्त्याच्या दुतर्फा असलेली झाडी वेळेवर तोडण्यात येत नाहीत. गार्डस्टोन, फार्लंगस्टोन वा रस्त्याची स्थिती दर्शवणाऱ्या कोणत्याही खुणा मार्गावर आढळून येत नाहीत. त्यामुळे आजच्या काळातील मोठी व वेगाने चालणारी वाहने एकमेकांवर आदळून वरच्यावर अपघात घडतात किंवा वाहनांचा ताबा सुटून वाहने दरीत कोसळतात. या परिस्थितीचा सर्वच यंत्रणांनी अभ्यास करणे गरजेचे आहे.

घाटमार्गातील रस्त्यावरील खड्डे, मोऱ्या, लहान-मोठ्या पुलांची निर्मिती केली पाहिजे. जागोजागी संरक्षक भिंती उभारल्या पाहिजेत. पा उपाययोजना केल्या, तरच अपघात थांबतील आणि वित्तहानीही टळेल- रघुनाथ पोस्टुरे, समाजसेवक

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:50 AM 04/Feb/2025