रत्नागिरी : मिरकरवाडा बंदर आता मोकळे झाले असून, त्याठिकाणचे पथदीप गेल्या वर्षभरापासून बंद आहेत. तसेच बंदरावर स्वच्छतागृहाची सोय नाही. याबाबत मत्स्य व्यवसायमंत्री नीतेश राणे आणि पालकमंत्री उदय सामंत यांना रत्नागिरीतील मच्छीमार साकडे घालणार आहेत.
समुद्र किनारी ड्रोन कॅमेऱ्याची गस्त सुरू झाल्यानंतर ट्रॉलिंग नौका मालकांची फारच अडचण झाली आहे. जिल्ह्याच्या समुद्रात १० वावाच्या आता मासेमारी करणाऱ्या ट्रॉलिंग नौकांचे ड्रोनद्वारे छायाचित्र टिपले जात असून, त्यातून दंडात्मक कारवाई केली जात आहे. बुरोंडी समुद्रात ५ वाजेपर्यंत समुद्रात मासेमारी करण्याची मुभा आहे. समुद्रात १० वावापर्यंत मासेमारी करणाऱ्या ट्रॉलिंग नौकांकडून प्रामुख्याने कोळंबी पकडली जाते. इतर मासळी फारच कमी प्रमाणात जाळ्यात अडकते. त्यामुळे १० वावाची मर्यादा बदलून मिळावी, अशी मच्छीमारांची मागणी आहे. पर्ससिननेट नौकांचा मासेमारी कालावधी वाढवून मिळावा, यासाठीही मच्छीमार आग्रही आहेत. तसेच मच्छीमारांसंदर्भात शासकीय यंत्रणांच्या अधिकाऱ्यांची जिल्हाधिकाऱ्यांसोबतच्या बैठका बंद असून, त्या सुरू व्हाव्यात, यासाठीही दोन्ही मंत्र्यांना विनंती केली जाणार आहे. मिरकरवाडा बंदरावरील सर्व अतिक्रमण हटवण्यात आल्यामुळे मासे खारवणे आणि सुकवण्यासाठी पर्यायी जागा मिळावी, अशी मागणी मिरकरवाडा येथील मच्छीमार करणार आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:50 AM 04/Feb/2025









