राजापूर : राजापूर नगरपालिकेसह सर्वच शासकीय कार्यालयातील बहुतांशी पदे रिक्त असल्याने नागरिकांच्या अडचणीत वाढच होत आहे. त्यामुळे अशा पदांवर कायमस्वरूपी अधिकारी द्यावेत, अशी नागरिकांची मागणी आहे.
गेल्या तीन वर्षांपासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकामुळे राजापूर पालिकेवर प्रशासकीय राज्य आहे. गेल्या सहा महिन्यांपासून कायमस्वरूपी मुख्याधिकारी नसल्याने शहराची दुरवस्था झाली आहे. शहरातील नागरिकांच्या समस्यांनी कळस गाठला आहे . छोट्या छोट्या कामांसाठी सततच्या चकरा माराव्या लागत असल्याने राजापूरकर चांगलेच मेटाकुटीस आले आहेत.
आरक्षणाच्या तिढ्यामुळे गेली तीन वर्षे राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडलेल्या असून याचा फटका राजापूर पालिकेलाही बसला आहे . गेली तीन वर्षे राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झालेल्या नाहीत. त्यामुळे पालिकेचा कारभार सध्या प्रशासकामार्फत केला जात आहे . राजापूरच्या प्रांताधिकाऱ्यांकडे सध्या हा कारभार आहे . राजापूरचे तत्कालीन मुख्याधिकारी प्रशांत भोसले यांची १६ सप्टेंबर २०२४ रोजी बदली झाल्यानंतर मुख्याधिकारीपद रिक्त आहे .
राजापूर पालिकेचा अतिरिक्त कार्यभार रत्नागिरीचे मुख्याधिकारी तुषार बाबर यांच्याकडे देण्यात आला आहे. मात्र रत्नागिरी पालिका सांभाळून आठवड्यातला एखादा दिवस ते राजापूरला देत असले तरी सध्या शहरात सुरू असणारी विकासकामे, नागरिकांचे प्रश्न, करवसुली, पाण्याचे व स्वच्छतेचे प्रश्न, बांधकामे असे अनेक प्रश्न प्रलंबित राहत आहेत . राज्य शासनाने प्रशासनाला शंभर दिवसांचा कार्यक्रम देताना नागरिकांना त्रास होऊ नये, याची काळजी घेण्याचे आवाहन केले असले तरी शासन स्तरावरूनच महत्त्वाची पदे भरली जात नसल्याने इतर अधिकारी, कर्मचारी हा कारभार हाकू शकत नाहीत. परिणामी नागरिकांना आपल्या कामांसाठी विविध कार्यालयांचे उंबरठे सातत्याने झिजवावे लागत आहेत.
राजापूर तालुक्यातील सर्वच शासकीय कार्यालयांमधील अनेक पदेही अद्यापही रिक्त असल्याने अनेक समस्या कायम आहेत. तालुक्याच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या नागरिकांना आपल्या कामांसाठी या रिक्त पदांच्या कार्यालयांचे उंबरठे सातत्याने झिजवावे लागत असल्याने नाराजीचा सुर उमटत आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:59 05-02-2025














