रत्नागिरी : ‘चांदणी’ नाटकातून शेतकऱ्यांच्या आत्महत्यांवर प्रकाश

रत्नागिरी : महागाई, अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे होणारे नुकसान आणि त्यामुळे शेतकऱ्यांना आत्महत्या करावी लागते. राज्यात अनेक शेतकऱ्यांच्या होणाऱ्या आत्महत्यांवर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न रोहित पगारे लिखित ‘चांदणी’ या नाटकातून करण्यात आला.

शहराजवळील मिरजोळे येथील श्री माघी गणेशोत्सव मंडळ, पाडावेवाडीतर्फे माघी गणेशोत्सवात तालुकास्तरीय नाट्यस्पर्धेत नाटकाचा रविवारी प्रयोग झाला. राज्य नाट्यस्पर्धेत नेपथ्य, अभिनयासह गाजलेल्या या नाटकाने रसिकांच्या मनाचा ठाव घेतला. येथील सहयोग रत्नागिरी संस्थेतर्फे तालुकास्तरीय स्पर्धेत हा प्रयोग सादर करण्यात आला. चांदणी या नाटकाचे दिग्दर्शन अजिंक्य केसरकर यांनी केले होते. शेतकरी वडील आणि तरुण मुलगा यांच्यातील संघर्ष, त्या दोघांमध्ये दुवा म्हणून ठामपणे उभी राहणारी मुलाची आई. नात्यांची गुंफण चांदणी या नाटकातून केली आहे.

चांदणी नाटकाची सुरवात उसाच्या मळ्यातून होते. मुलगा भरत्या वन्यप्राण्यांपासून उसाच्या मळ्याचे संरक्षण व्हावे यासाठी माच बांधून शेतात राखण करत असतो. वडील त्याच्या मदतीला येत असतात. आई या दोघांमधील संघर्षाचा ती एक युवा असते. शेतावर मोबाईल बघणारा भरत्या शेतावरही वडिलांचा मार खातो तर घरी आल्यावरही मार खातो; पण दोघांचं अतूट नातं चांदणी या नाटकातून दाखवण्यात आले आहे. आई वडिलांचे ऋण आणि प्रेम दूर व्हावे, असे मुलालाही वाटत नसते, वडिलांनी शेत सावकाराकडे गहाण टाकलेले असते; पण शेवटपर्यंत ते मुलाला सांगत नसतात; मात्र हसतखेळत कधी रागवून त्याच्याशी मिष्किलपणे वागून त्याला जगण्याची उमेद निर्माण करतात. वडील मुलांचे प्रेम पाहताना रसिकांच्या डोळ्यांतून अश्रूारी अनावर होत होते.

कालांतराने या दोघांमधील दुवा आईचा मृत्यू होतो. दोघेही ऊसाच्या मळ्यात असतात. वडील मुलाला समजावतात. त्याच्या मनात आत्महत्येचे विचार येऊ नयेत म्हणून प्रयत्नशील असतात. शेवटी शेतीचे रक्षण करताना वाघ येतो, त्याला पिटाळून लावत असताना मुलगा पुढे जातो. त्याचा जीव वाचावा म्हणून वडील वाघाच्या तोंडी जातात, अशी कथा रंगवण्यात आली आहे.

नाटकातील कलाकार
अजिंक्य केसरकर, दीपक माणगावकर, श्रुतिका कदम यांनी भूमिका साकारल्या तर पार्श्वसंगीत-शाहबाज गोलंदाज, प्रकाशयोजना यश सुर्वे, नेपथ्य विनायक उर्फ जॉनी अपको. रंगभूषा- नरेश पांचाळ, रंगमंच व्यवस्था निरंजन सागवेकर, गायन कश्मिरा सावंत-माणगावकर यांनी केले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:09 PM 05/Feb/2025