या लोकांना दिसेल तिथे ठेचलं आणि गाडलं पाहिजे; राहुल सोलापूरकरच्या विधानावर खासदार उदयनराजे भोसलेंची संतप्त प्रतिक्रिया

मुंबई : अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी युगपुरूष छत्रपती शिवाजी महाराज यांनी आग्र्याहून सुटका करताना औरंगजेबाच्या सरदारांना लाच दिल्याचा जावाईशोध लावला. त्यानंतर त्यांच्याविरोधात राज्यात संतापाची लाट उसळली.

छत्रपतींचे वंशज आणि खासदार उदयनराजे भोसले यांनी त्यांच्यावर तीव्र संताप व्यक्त केला आहे. राहुल सोलापूरकर यांना गोळ्या घालूनच मारलं पाहिजे असे टोकाचं विधान त्यांनी केलं. तर सोलापूरकर जिथे दिसेल तिथे ठेचा आणि त्याला गाडा असा संताप त्यांनी व्यक्त केला आहे.

यांना वेचून ठेचलं पाहिजे

केवळ मलाच नाही शिवभक्तांना वेदना होतात. काय असं विधान केलं. हा राहुल सोलापूरकर कोण आहे. तो जो म्हणाला लाच. जे लाच घेतात यांना लाचपलिकडे काही समजत नाही. असं बोलतांना जिभेला हाड नसतं माहीत आहे. लावली जीभ टाळूला काहीही बोलायचं. अशा लोकांच्या जीभा हासडल्या गेल्या पाहिजे. महापुरुषांबद्दल अशी विधानं करतात अशा लोकांना दिसेल तिथे ठेचलं पाहिजे. वेचून ठेचलं पाहिजे, असा संताप उदयनराजे यांनी व्यक्त केला. ही विकृतीची वाढ झाली तर देशाच्या अखंडतेला धोका निर्माण होईल. वेगवेगळ्या जातीधर्मात अशा विकृतांमुळे तेढ निर्माण होते, असे ते म्हणाले.

अमित शाह यांच्याकडे करणार तक्रार

फडणवीस यांना भेटणार आहे. अमित शाह यांनाही भेटणार आहे. अशी विधाने करणार्‍यांवर कडक कारवाई करावी. देशद्रोहाचा कायदा त्यांच्यावर लागू केला पाहिजे, अशी मागणी उदयनराजे यांनी केली. शिवाजी महाराजांचे विचार आपण जपले नाही तर देशाचे तुकडे व्हायला फार काळ लागणार नाही. विकृत विधाने करणार्‍यांना थांबवलं पाहिजे. त्यांचे सिनेमे बंद केले पाहिजे. निर्माते, दिग्दर्शकांनीही अशा लोकांनाही थारा देऊ नये, असे आवाहन त्यांनी केले.

अशा लोकांना गाडलं पाहिजे

या लोकांना गाडलं पाहिजे. त्यांना गाडलं नाही तर देशाच्या अखंडतेचा प्रश्न आहे. कठोर शब्दात मी निषेध करतो. मला विचारलं तर त्याला गोळ्या घालून मारलं पाहिजे. त्यालाच नाही तर असे जे जे लोकं असतील त्या सर्वांना गोळ्या घातल्या पाहिजे. कुणीही बेताल विधानं करायचं.

जीवाची पर्वा न करता शिवाजी महाराज पुढे गेले. अशा महापुरुषांबद्दल अशी विधाने होत असतील तर दुसरा काही पर्याय नाही. तो जिथे दिसेल त्याचा ठेचा आणि गाडा, असा संताप राजेंनी व्यक्त केला.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:04 05-02-2025