रत्नागिरी : एसटी कार्यशाळेचा भार शिकाऊ १२० मुलांवर

रत्नागिरी : रत्नागिरी राज्य परिवहन एसटी विभागामार्फत जिल्ह्यात ८८० एसटी बसेस प्रवासांच्या दिमतीला धावत असतात; पण या बसच्या देखभाल-दुरुस्तीचा गाडा सांभाळणाऱ्या विभागाच्या वर्कशॉपमधील १९८ विविध तंत्रज्ञांच्या रिक्त पदांमुळे सध्या आयटीआय अप्रेंटिस करणाऱ्या १२० उमेदवारांच्या साथीने भार पेलून नेला जात आहे. त्यामुळे राज्य शासन एसटीमध्ये पदभरती कधी करणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक लांबपल्ल्यांच्या गाड्यांमध्ये किंवा एसटी सुखद प्रवासासाठी अन्य राज्यांना भेटी देऊन पाहणी करीत आहेत. कोकण हा भाग डोंगराळ असल्याने ग्रामीण भागात अगदी सह्याद्रीच्या टोकापर्यंत अनेक गावांत एसटी धावत असतात. रत्नागिरी जिल्ह्यात नऊ आगार असून या ठिकाणी एसटीच्या देखभाल दुरुस्तीचे काम चालते. रत्नागिरीत विभागीय कार्यालयासह टीआरपीमध्येही देखभालीवर लक्ष दिले जाते.

जिल्हयातील एसटी वाहतूक सुरळीत रहावी, म्हणून त्यासाठी अविरत देखभाल दुरूस्तीचे काम चालत असते. मात्र, एसटी वर्कशॉपमध्ये विविध तंत्रज्ञांच्या रिक्त पदांमुळे तारेवरी कसरत करावी लागत आहे. रत्नागिरी जिल्ह्यात देखभाल दुरुस्ती या विभागात ३३९ पदे मंजूर आहेत. पण त्यातील १९८ रिक्त पदांच्याया ठिकाणी नवीन भरती प्रतिक्षा लागून राहिलेली आहे. सध्या कामकाज व्यवस्थित चालू राहण्यासाठी आयटीआय पूर्ण झालेल्या उमेदवारांना अप्रेंटिसशीप दिली जात आहे. या माध्यमातून मानधन तत्वावर काम निभावून नेले जात आहे. या उमेदवारांना प्रति महिना १० हजार रुपये मानधन दिले जात आहे.

जिल्ह्यात ८८० एसटी बसेस आहेत, पण देखभाल दुरूस्तीच्या कारणास्तव सद्या ६३० एसटी बसेस प्रवासी सेवेसाठी विविध मार्गांवर धावताना दिसून येतात. या बसेसी देखभाल दुरूस्ती सांभाळणाऱ्या वर्कशॉपमधील तंत्रज्ञांची मोठी कसरत होताना दिसते. नवीन भरती रखडलेली आहे. अशावेळी शासनाकडून आयटीआय पूर्ण झालेल्या उमेदवारीं साथ घेण्यात आली आहे. अलिकडे या विभागातील जुने कर्मचारी सेवानिवृत्तीच्या मार्गावर आहेत. त्यामुळे रिक्त पदांचा भार दिवसागणिक वाढत असल्याने या विभागा डोलारा आणखी डळमळीत होताना दिसत आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:30 AM 06/Feb/2025