रत्नागिरी : शहरात भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या संख्येला आळा घालण्यासाठी पालिका निर्बीजीकरणासाठी मोहीम हाती घेणार आहे. यासाठी सुमारे २५ लाखांची आर्थिक तरतूद केली आहे. लवकरच या मोहिमेला सुरुवात केली जाणार आहे.
शहरात भटक्या कुत्र्ऱ्यांचा उपद्रव वाढला आहे. यापूर्वी लहान मुलांवर हल्ला झाल्याच्या घटना घडल्या होत्या. त्यामुळे नागरिकांनी भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली. वाढत्या उपद्रवामुळे भटक्या कुत्र्यांना औषध घालून मारल्याचाही प्रकार घडला होता. यावर प्राणीप्रेमींनी आक्षेप घेत शहर पोलिसात गुन्हा दाखल केला होता. शहरात सुमारे पाच हजार भटकी कुत्रे असल्याची माहिती पालिकेकडे आहे. त्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. झुंडीने असलेली ही कुत्री अनेकवेळा पादचारी किंवा दुचाकीधारकांचा पाठलाग करून हल्ला करतात. पशुवैद्यकीय अधिकारी यांची नेमणूक करून त्यांच्या मार्गदर्शनाखाली ही नसबंदी मोहीम राबविण्यात येणार असल्याची माहिती पालिकेच्या सफाई विभागामार्फत देण्यात आली आहे. या उपक्रमांतर्गत भटक्या कुत्र्यांची नसबंदी शस्त्रक्रिया, अँटी रेबीज व्हॅक्सिन आणि स्किनचे आजार त्यावर उपचार करण्यात येणार आहे. यासाठी सोसायटी फॉर अॅनिमल प्रोटेक्शन, कोल्हापूर या संस्थेला हे काम सोपवले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:15 AM 06/Feb/2025














