दापोली : दापोली किनारपट्टीवर उत्तरेकडील जोरदार वाऱ्यामुळे मासेमारीला ब्रेक लागला आहे. किमान ८० टक्के नौका नांगर टाकून उभ्या आहेत, त्यामुळे हर्णे बंदरात मासळीच नाही. त्यामुळे गेले महिनाभर मत्स्य दुष्काळसदृश परिस्थितीमध्ये दुष्काळात तेरावाप्रमाणे मच्छीमारांची अवस्था झाली असून, हर्णे बंदराची आर्थिक घडीच विस्कटली आहे. याचा परिणाम येथील उद्योगविश्वावर झालेला दिसत आहे. रोज होणारी करोडो रुपयांची उलाढाल थांबली आहे.
गेले ४ ते ५ दिवसांपासून अचानक किनारपट्टीला उत्तरेकडील जोरदार वारे वाहू लागले आहेत. त्यामुळे गेली चार ते पाच दिवस थंडीचे प्रमाणसुद्धा वाढले आहे. १ जानेवारी रोजी किमान तापमान ९.४ आले होते. तेव्हापासून दापोलीमध्ये थंडीचे प्रमाणदेखील चांगलेच वाढले आहे. गेल्या साधारण महिन्याभरात वातावरणात उन्हाळा सुरू झाला होता तेव्हा नागरिकांना चांगलेच उन्हाचे चटके बसायला लागले होते; परंतु गेल्या ४ ते ५ दिवसांपूर्वीपासूनच किनारपट्टीला सुटलेल्या जोरदार वाऱ्यामुळे थंडीचे प्रमाण खूपच वाढले आहे.
उत्तरेकडील वाऱ्यामुळे खोल समुद्रात पाण्यामध्ये मासेमारी करणे शक्य होत नाही. यामुळे मासेमारी करत टाकलेली जाळीदेखील गुरफटली आहेत आणि आता ते मच्छीमारांना सोडवायला लागत आहेत. यामध्ये जाळ्यांचे नुकसान खूप होते म्हणूनच अशा जोरदार वाऱ्यामुळे मच्छीमार समुद्रात मासेमारीला जात नाहीत. त्यामुळे हर्णे बंदरात किमान १५० नौका, आंजर्ले खाडीत ४५० नौका, तर उर्वरित २५ टक्के नौका घेऊन मच्छीमार आपल्या जबाबदारीवर मासमारीला गेले आहेत; परंतु वारा कमी होत नसल्याने गेलेल्या नौकादेखील मासळीविना परतसुद्धा येऊ शकतात गेले महिनाभर फक्त टायनी कोळंबावर बंदर तग धरून होते; मात्र आता उत्तरेच्या वाऱ्यामुळे बोटीच किनाऱ्यावर आणाव्या लागल्यामुळे उलाढाल थंडावली आहे, असे येथील मच्छीमारांनी सांगितले.
हंगाम सुरू झाल्यापासून तशी मासळीची आवकच घटली आहे आणि त्यात असे प्रसंग आले की, मच्छीमारांनी काय करायचं, नोकरांचा पगार अंगावरच पडतो. जोपर्यंत हा वारा थांबत नाही तोपर्यंत खोल समुद्रात मासेमारीला जाऊ शकत नाही- अनंत चौगले, स्थानिक मच्छीमार
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:28 PM 06/Feb/2025














