देवरुख : सध्याच्या तंत्रज्ञानाच्या जगात तरुणांचा शेतीकडील ओढा कमी झाला आहे. अपुरे मनुष्यबळ, जमिनीचा घसरलेला कस, हिस्सेदारीतील तुकड्यामुळे कमी होत गेलेले क्षेत्र यामुळे अनेक शेतकऱ्यांनी शेती सोडून उदरनिर्वाहासाठी दुसरे पर्याय शोधले आहेत. संगमेश्वर तालुक्यातील चोरवणे चिखल भाटले येथील शांताराम पडीलकर यांनी मात्र अनोखी कल्पना राबवत चक्क घरातील मांडवावरच रताळ्याची शेती केली आहे. त्यांच्या या अनोख्या प्रयोगाचे परिसरात कुतूहल असून, अनेकजण भेट घेऊन याची माहिती घेत आहेत. रताळे ही भाजी उपवासासाठी वापरली जातात. रताळे कच्चे वा भाजलेलेदेखील खाता येते. असा हा रताळ्याचा वापर केला जातो. रताळे ही जमिनीतच तयार होतात, यासाठी रताळ्याची लागवड करत असताना भुसभुशीत व कसदार अशी जमीन निवडली जाते. यानंतर तिची लागवड व मशागत करून जमिनीमधून रताळे बाहेर काढले जाते.
जमिनीमध्ये लागवड करत असताना घुशी व उंदीर या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान करतात. याचबरोबर लागवड केलेला परिसर बंदिस्त नसेल तर वन्यप्राणी व गुरे या पिकाचे नुकसान करतात. यामुळे चोरवणे येथील या शेतकऱ्यांनी रताळी लागवडीचा वेगळाच फॉर्म्युला राबवला. या शेतकऱ्यांनी घर परिसरातील एका मांडवावर माती टाकून रताळ्याची लागवड केली. जमिनीपासून उंचीवर असल्यामुळे हे पीक १०० टक्के हाती येणार आहे.
मांडवावर शेती म्हटले की, त्यावर दोडका, काकडी, तोंडली, कारली, पारेसे, भोपळा, कोवाळा, पडवळ या वेलवर्गीय भाज्या डोळ्यासमोर येतात; मात्र पडीलकर यांच्या या नवीन रताळ लागवडीला चांगल्या प्रकारचे यश देखील मिळत आहे. या शेतकऱ्याचा हा नवीन फॉम्र्म्युला सर्वच शेतकऱ्यांना प्रभावित करत आहे.
तूर्तास ही लागवड छोट्या प्रमाणात असली, तरी भविष्यात अशा प्रकारे चांगले उत्पादन घेण्याचा प्रयत्न करणार आहे. – शांताराम पडीलकर, शेतकरी, चोरवणे
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:52 PM 06/Feb/2025














