राजापूर : शाडू मातीसाठी शासनाकडून अनुदान

राजापूर : प्लास्टिकचा धोका टाजण्यासाठी पर्यावरणपूरक गणेशाच्या शाडू मातीच्या मूर्तीना प्राधान्य दिले जात आहे. मात्र दरववर्षी शाडू मातीच्या दरामध्ये होणाऱ्या वाढीमुळे मूर्तिकारांना शाडू मातीच्या मूर्ती बनवणे आर्थिकदृष्ट्या परवडत नाही. त्यामुळे श्रीगणेश मूर्ती बनवण्यासाठी शासनाकडून शाडूची माती मोफत मिळावी, या श्रीगणेश मूर्तिकार संघाने निवेदनाद्वारे केलेल्या मागणीची दखल आमदार किरण सामंत यांनी घेतली. मूर्तिकारांना सिंधुरत्न योजनेतून अनुदान उपलब्ध करून देण्याचा जिल्हाधिकाऱ्यांना सूचित केले.

प्लास्टिकचा धोका टाळण्यासाठी पर्यावरणपूरक असलेल्या श्री गणेशाच्या शाडूच्या मूर्तीना प्राधान्य दिले जात आहे, मात्र शाडू मातीच्या दरामध्ये दरवर्षी वाढ होते.

त्यामुळे दरवाढ करावी लागते. ही दरवाढ मूर्तिकारांसह गणेशभक्तांनाही न परवडणारी ठरते. त्यातून काही मूर्तिकार शाडू मातीच्या मूर्ती बनवण्याऐवजी प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती बनवतात. हे टाळण्यासाठी मूर्ती बनवण्यासाठी आवश्यक शाडू माती शासनाने मूर्तिकारांना मोफत उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी श्रीगणेश मूर्तिकार संघाने आमदार किरण सामंत यांच्याकडे केली.

याबाबतचे निवेदन संघाचे अध्यक्ष कैलास कोठारकर यांनी शहरातील वरचीपेठ येथील श्री महापुरुष देवस्थान येथे श्रीगणेश मूर्तिकार संघाच्यावतीने दिले होते. या वेळी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख अशफाक हानू, रानू कुरुप, तालुका प्रमुख दीपक नागले, राजापूर तालुका कुणबी पतपेढीचे अध्यक्ष प्रकाश मांडवकर आदी उपस्थित होते. या निवेदनाची दखल घेत सामंत यांनी जिल्हाधिकारी यांना सिंधुत्न समितीच्या माध्यमातून जिल्ह्यातील मूर्तिकारांना शाडू माती खरेदीसाठी अनुदान उपलब्ध करून देण्याचे सूचित केले. या अनुदान वाटपाबाबतचे निकष आपल्या स्तरावर निश्चित करण्याबाबतही त्यांनी सूचना केली.

शाडू मातीच्या दरवाढीमुळे पर्यावरणपूरक शाडू मातीच्या गणेशमूर्ती बनवणे आर्थिकदृ‌ष्ट्या मूर्तिकारांना परवडत नाही. अशा स्थितीमध्ये आमदार किरण सामंत यांनी माती खरेदीसाठी अनुदान देण्याचा घेतलेला निर्णय निश्चितच आनंददायी आहे- काशिनाथ गुरव, सचिव, श्री गणेशा मुर्तिकार संघ

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:27 PM 06/Feb/2025