भोंदूबाबांच्या शोषणाविरुद्ध युवकांनी लढा द्यावा : रवींद्र खानविलकर

सावर्डे : सर्वसामान्य लोकांमध्ये असणारे अज्ञान, झटपट श्रीमंत होण्याची लालसा व मानसिकता या बाबींचा गैरफायदा उचलून आज समाजामध्ये अनेक भोंदूगिरी करणारे लोक आढळून येतात. युवापिढीने या भोंदूबाबांच्या शोषणाविरुद्ध लढा देऊन सर्वसामान्य माणसांची सुटका केली पाहिजे व सर्वसामान्यांच्या मध्ये तार्किक विचार करण्याची जागृती करावी, असे आवाहन अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष रवींद्र खानविलकर यांनी केले.

सावर्डे येथील गोविंदराव निकम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात कोकण विभाग आयोजित अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मलन समितीच्या वतीने वैज्ञानिक दृष्टिकोन चमत्कार प्रात्यक्षिकांसह व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. या प्रसंगी खानविलकर बोलत होते. या वेळी राष्ट्रीय कोषाध्यक्ष जगनाथ साबळे, चिपळूण तालुकाध्यक्ष सचिन तांबे मुख्याध्यापक राजेंद्र वारे, उपमुख्याध्यापक विजय चव्हाण, पर्यवेक्षक उद्धव तोडकर या वेळी उपस्थित होते. श्री. खानविलकर यांनी आजची सामाजिक स्थिती व त्याचा गैरफायदा घेऊन समाजाला फसवणाऱ्या भोवाबांचे जीवन व त्यांच्या विविध क्लुप्त्या कशा मारक आहेत, याची माहिती विद्यार्थ्यांना उदाहरणासह दिली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:45 AM 07/Feb/2025