रत्नागिरी : प्रधानमंत्री सूर्य घर मोफत वीज योजनेच्या माध्यमातून रत्नागिरी जिल्ह्यात १ हजार ६०२ ग्राहकांनी महावितरणकडे अर्ज दाखल केले आहेत. त्यापैकी आतापर्यंत ५५५ लाभार्थ्यांच्या घराच्या छतावर सौरऊर्जा यंत्रणा बसविली आहे. प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेला ‘महावितरण’च्या रत्नागिरी परिमंडळात चांगला प्रतिसाद मिळत असून, या माध्यमातून मोठ्या प्रमाणात विजेची बचत होण्यास मदत होणार आहे.
महिनाभरात ३०० युनिटपर्यंत वीज वापरणाऱ्या ग्राहकांना मोफत वीज मिळावी आणि अतिरिक्त वीज विकून उत्पन्न मिळावे, यासाठी केंद्र सरकारने सुरू केलेल्या या योजनेची अंमलबजावणी सुरू आहे. प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेत केंद्र सरकारकडून छतावरील सौरऊर्जा निर्मितीचे रूफ टॉप सोलर प्रकल्प बसविणाऱ्या वीज ग्राहकांना एक किलोवॅट क्षमतेच्या प्रकल्पाला ६० हजार रुपये व तीन किलोवॉट किंवा त्यापेक्षा अधिक क्षमतेच्या प्रकल्पाला ७८ हजार रुपये अनुदान मिळते. छतावरील सौरऊर्जा निर्मिती प्रकल्पात निर्माण झालेली वीज घरात वापरण्याबरोबरच प्रकल्पात गरजेपेक्षा अधिक वीज निर्माण झाल्याने वीजबिल शून्य येते, तसेच अतिरिक्त वीज ‘महावितरण’ला विकता येते. याशिवाय, सौरउर्जेमुळे पर्यावरण रक्षणालाही मदत होते, तसेच ग्राहकांनाही आर्थिक लाभ होतो. ग्राहकाने वापरलेल्या विजेतून शिल्लक राहिलेली वीज ‘महावितरण’ विकत घेते. वीजग्राहकांना महावितरणच्या संकेतस्थळावर योजनेची सर्व माहिती उपलब्ध केलेली आहे, तसेच नोंदणी करण्यासाठी पीएम-सूर्यघर हे अत्याधुनिक मोबाईल अॅप उपलब्ध आहे. त्यावर नोंदणी केल्यावर छतावरील सौरऊर्जा निर्मिती प्रकल्प बसविण्यासाठी ग्राहकांना आपल्या पसंतीनुसार विक्रेता निवडता येतो. छतावर सौरऊर्जा प्रकल्प बसविल्यावर अनुदान थेट ग्राहकांच्या खात्यात जमा केले जाते.
अशी होते वीजनिर्मिती…
एक किलोवॅटच्या सौर यंत्रणेतून दरमहा सुमारे १२० युनिट वीज तयार होते. २ किलोवॅट सौर यंत्रणेतून दरमहा २४० युनिट तर ३ किलोवॅट मधून ३६० युनिट वीज तयार होते. या सौर यंत्रणेची २५ वर्षांपर्यंत वीजनिर्मिती क्षमता असल्याने ग्राहकांना त्याचा मोठा फायदा मिळतो.
हरितऊर्जेच्या दिशेने पाऊल
या सौरऊर्जा प्रकल्पामुळे वीजबिल शून्यापर्यंत येते, तसेच नैसर्गिक स्रोतापासून अक्षय ऊर्जा या माध्यमातून वीज उपलब्ध होते. यासाठी शासनाचे अनुदान आहे. तसेच, हरित ऊर्जा धोरण राबविण्यासाठी पोषक असून, सौर यंत्रणेची वॉरंटीही उपलब्ध आहे. स्वतःच्या खर्चाने जरी सौर यंत्रणा बसविली, तरीही कालांतराने परवडते. अधिकाधिक ग्राहकांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
05:55 PM 07/Feb/2025














