लांजा : शालेय जीवनापासूनच लेखन आणि अभिव्यक्ती गुण विध्यार्थ्यांमध्ये रुजायला हवे. शालेय पुस्तकांप्रमाणे मराठीतील नामवंत लेखक, कवी, साहित्यिकांची पुस्तके वाचावीत जेणेकरून विद्यार्थ्यांच्या विचारांची प्रगल्भता वाढेल आणि सामाजिक जीवन जगताना नवोदित लेखक कवीही निर्माण होतील, असे प्रतिपादन कोकण मराठी साहित्य परिषदेचे युवाशक्ती जिल्हाध्यक्ष अरुण मौर्ये यांनी लांजा तालुक्यातील न्यू इंग्लिश स्कूल व आश्रम शाळा जावडे येथे केले.
मराठी भाषा पंधरवडानिमित्त कोमसाप युवाशक्ती रत्नागिरी जिल्हा व न्यू इंग्लिश स्कूल व आश्रम शाळा जावडे यांच्या संयुक्त विद्यमाने जावडे येथे काव्यवाचन व कवितेवर बोलू काही कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. न्यू इंग्लिश स्कूल जावडे व आश्रम शाळा जावडेचे संस्थापक तथा मुख्यकार्यकारी अधिकारी संतोष कांबळे व अध्यक्षा अॅड. अपर्णा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित केलेल्या या कार्यक्रमाप्रसंगी मुख्याध्यापक संदेश कांबळे, मुख्याध्यापक गजानन पांचाळ, कोमसाप लांजा शाखा युवाशक्ती प्रमुख प्रवीण कांबळे उपस्थित होते.
काव्यवाचन स्पर्धेची सुरुवात दीप्रज्वलन करून झाली. त्यानंतर शाळेतील १८ विद्यार्थ्यांनी स्वरचित कवितांचे वाचन केले. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक संदेश कांबळे यांनी विध्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. काव्यवाचन केलेल्या सर्व स्पर्धक विध्यार्थ्यांना कोमसापकडून प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. या कार्यक्रमाला विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:58 AM 08/Feb/2025














