“गणपती बुद्धीची देवता, सर्वांत जास्त गरज आहे त्यांना बुद्धी द्यावी”: देवेंद्र फडणवीस

मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्व पक्ष तयारीला लागले आहेत. महायुती आणि महाविकास आघाडीत जागावाटपाच्या चर्चा अंतिम टप्प्यात आल्याचे म्हटले जात आहे.

अनेक जागांवर एकमत झाले असून, काही जागांवरील निर्णय लवकरच पूर्ण होईल, असा विश्वास दोन्ही गटांकडून केला जात आहे. यातच अनंत चतुर्दशीला गणरायाला निरोप देण्यात येत आहे. देवेंद्र फडणवीस यांनी घरी विराजमान झालेल्या बाप्पाला निरोप दिला. यावेळी त्यांनी विरोधकांना टोला लगावला.

राज्यात नोव्हेंबर महिन्याच्या मध्यावर विधानसभा निवडणूक होण्याचे संकेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले होते. महायुतीच्या नेत्यांमध्ये सध्या जागावाटपाची बोलणी सुरु आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत जिंकण्याचा विश्वास असलेल्या ८५ जागा भाजपाने काढल्या असून, त्यावर लक्ष केंद्रित करताना गेल्यावेळी जिंकलेल्यांपैकी २५ जागांवर यावेळी अधिक मेहनत करावी लागणार असल्याचा सूर पक्षाच्या विविध बैठकांमध्ये व्यक्त होत आहे.

गणपती बुद्धीची देवता, सर्वांत जास्त गरज आहे त्यांना बुद्धी द्यावी

शासकीय निवासस्थानी सहकुटुंब गौरीनंदन गणरायाची आरती केली. गेले दहा दिवस गणरायाच्या सहवासामध्ये कसे गेले ते कळलेच नाही. बाप्पांना निरोप देण्याचा क्षण आला आहे. यावेळी गणरायाकडे जनतेच्या सर्व चिंता-विघ्ने दूर करावे आणि पुढच्या वर्षी अशाच प्रकारे हसत खेळत आनंद घेऊन लवकर यावे, अशी प्रार्थना केली, असे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. तसेच गणपती बाप्पा हा विघ्नहर्ता आहे. त्याने सर्वांची विघ्न दूर करावीत. तसेच गणपती हा बुद्धीची देवता आहे. त्यामुळे गणपती बाप्पााने आम्हालाही सुबुद्धी द्यावी आणि ज्यांना सर्वात जास्त बुद्धीची गरज आहे त्यांनाही द्यावी, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

दरम्यान, महायुतीतील दोन मित्रपक्षांशी समन्वय राखण्याची जबाबदारी भाजपने ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांच्याकडे दिली आहे. महायुतीमध्ये भाजप १५५ ते १६० जागा लढण्याची शक्यता आहे. त्यातील १२५ जागा जिंकण्याचे उद्दिष्ट पक्षाने ठेवले असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:52 17-09-2024