चिपळूण : उन्हाळ्याच्या दिवसांत तालुक्यातील अनेक गावांना पाणी टंचाई जाणवते. याबाबत टंचाईग्रस्त गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याच्या दृष्टीने संभाव्य टंचाई आराखडा तयार करण्यात येतो. याबाबतची बैठक सोमवार, दि. १० रोजी सकाळी १० वा. पंचायत समितीच्या सभागृहात आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला आमदार शेखर निकम व आमदार भास्कर जाधव उपस्थित राहाणार आहेत. दरवर्षी पाणी टंचाई आराखड्याबाबत डिसेंबर महिन्यातच बैठक घेण्यात येते.
मात्र, यावर्षी फेब्रुवारी महिन्यात होणाऱ्या बैठकीसाठी ग्रामपंचायत सरपंच, अधिकाऱ्यांना निमंत्रित करण्यात आले आहे. दोन वर्षांपासून तालुक्यात जलजीवन मिशन योजनेतून कोट्यवधी खर्चाच्या पाणी योजनांची कामे सुरू आहेत. मात्र, अद्यापही काही गावांना पाणी टंचाईची झळ बसते. तालुक्यातील टेरव व अन्य काही गावांमधील पाणी योजना वादग्रस्त आहेत. तसेच काहीजण योजना होण्यासाठी प्रयत्न करतात तर काही योजनांबाबत तक्रारी करीत आहेत. त्यामुळे हा मुद्दा यावेळी चर्चिला जाण्याची शक्यता आहे. तसेच संभाव्य पाणी टंचाईग्रस्त गावांची माहिती यावेळी द्यावी अशा सूचना ग्रामपंचायतींना करण्यात आल्या आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:28 AM 10/Feb/2025














