रत्नागिरी : गोवा राज्याप्रमाणे महाराष्ट्रातही काजूला हमीभाव मिळावा, या मागणीसाठी शेतकरी, बागायतदार अविनाश काळे यांनी उपोषणाचा इशास दिला आहे. काजू बी शेतकऱ्यांना संकटातून बाहेर काढण्यासाठी रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्यात गावठी काजू बीसाठी किमान १६० रु. आणि वेंगुर्ला काजू बीसाठी १८० रु. हमीभाव शासनाने द्यावा. सध्या हंगाम सुरू होत असल्याने हमीभाव तातडीने १९ फेब्रुवारीपर्यंत जाहीर करावा अन्यथा २० फेब्रुवारीला उपोषणाला बसणार असल्याचे काळे यांनी जाहीर केले.
या संदर्भातील निवेदन काळे यांनी पालकमंत्री उदय सामंत, आमदार किरण सामंत पोलिस आणि जिल्हा प्रशासनाला दिले आहे. त्यांनी सांगितले की, गोव्यात राज्य सरकारने काजूसाठी किमान आधारभूत (खात्रीशीर) दर १५० वरून १७० रुपये केला आहे. त्यामुळे तिथल्या शेतकऱ्यांना लाभ मिळतो; परंतु कोकणातील काजू उत्पादकांना हमीभाव मिळत नसल्याने ते अडचणीत सापडले आहेत. काळे म्हणाले, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात हजारो काजू बागायतदार आहेत. गेली काही वर्षे गावठी आणि वेंगुर्ला काजू बी चा दर ८० ते १० किलोच्या दरम्यान आहे.
सध्या काजू बागा साफ करणे, निगा राखणे, मजुरीचे गगनाला भिडलेले दर, विविध रोगांमुळे काजूवर अपरिहार्य झालेली फवारणी, त्याचा खर्च, काजू बी धरल्यापासून पुढे सुकवून विकेपर्यंत होणारा खर्च, पडलेल्या बियांचे सालिंदर, उंदीर आणि इतर प्राण्यांपासून होणारे नुकसान यामुळे एक किलो बीसाठी येणारा खर्च जवळपास शंभर ते एकशे वीस रुपयांच्या पुढे जातो. मिळणाऱ्या कमी दरामुळे काजू बी उत्पादक हे उत्पन आणि खर्च याचा ताळमेळ बसत नसल्याने संकटात आहेत.
अनुदान मिळण्यात अडचणी
गेल्या वर्षी काजू बीसाठी काजू बोर्डातून प्रतिकिलो दहा रुपये अनुदान शासनाने सीझन संपताना जाहीर केले होते. बरेचसे शेतकरी वजन खूप कमी होत असल्याने घरी येणाऱ्या खरेदीदाराकडे बिया विकतात. त्यामुळे जीएसटी सोडा पक्की पावती मिळण्यातसुद्धा अडचणी येतात. त्यामुळे अनुदान मिळण्यासाठी सुद्धा अडचणी आल्या.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
05:50 PM 10/Feb/2025














