राजापूर : किनारपट्टी भागातील होणाऱ्या स्पर्धांना सर्वतोपरी सहकार्य करणारच पण त्याबरोबरच किनारपट्टी भागाचा पर्यटनाच्या माध्यमातून विकास साधण्यासाठी आराखडा तयार करणार, असे प्रतिपादन राजापूर-लांजा-साखरपा मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार किरण सामंत यांनी मिठगवाणे येथे केले.
राजापूर तालुक्यातील मिठगवाणे येथे रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय आमदार चषक व्हॉलीबॉल स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. माझ्या मतदारसंघातील प्रत्येक नागरिक हा आमदार आहे. आपण सर्वांनी मिळून काम करूया. विकासकामांना ऊठसूट विरोध सहन केला जाणार नाही, पुढील दोन वर्षांत तालुक्याचा संपूर्ण बॅकलॉग भरून काढणार. क्रीडा सांस्कृतिक उपक्रमांना सहकार्य करणारच, पण त्याचबरोबर तालुक्याच्या सर्वांगीण विकासाचा आराखडा सर्वांनी मिळून तयार करूया आणि कामाला लागू या. शासनाकडून मंजुरी आणि निधी आणण्याची जबाबदारी माझी असेल, असे प्रतिपादन याप्रसंगी आमदार सामंत यांनी केले.
मागील ७० वर्षांपासून मिठगवाणे येथे व्हॉलीबॉल स्पर्धांचे आयोजन करण्यात येत आहे. या वर्षी ही स्पर्धा ‘आमदार चषक’ या नावाने आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी व्यासपीठावर विलास चाळके, दिलीप सावंत, संतोष तावडे, अश्फाक हाजू, अॅड. शशिकांत सुतार, जैतापूर सरपंच राजप्रसाद राऊत, मिठगवाणे सरपंच आशा काजवे आदी उपस्थित होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:40 AM 11/Feb/2025














