खेड : जगबुडी नदीपात्रातील पाणीपातळी घटतेय

खेड : तालुक्यात यंदा समाधानकारक पर्जन्यवृष्टी झाल्यामुळे जगबुडी नदीपात्रासह नारिंगी नदी व ग्रामीण भागातील नद्यांमध्ये मुबलक पाणीसाठा झाला होता; मात्र उष्मा वाढू लागल्यामुळे उपलब्ध पाण्याच्या जलस्रोतांमध्ये घट होत आहे. परिणामी, भरणे जगबुडी नदीपात्र आटले आहे. त्यामुळे पाणीप्रश्न गंभीर बनण्याची शक्यता नाकारता येत नाही.

तालुक्यात यंदा ४३४२ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. धुवाधार पर्जन्यवृष्टीमुळे तालुक्यातील नातूनगर, शिरवली, पिंपळवाडी, कोडिवली धरणदेखील ‘ओव्हरफ्लो’ होऊन मुबलक प्रमाणात उपयुक्त पाणीसाठा निर्माण झाला होता.

धरणातील मुबलक पाणीसाठ्यामुळे पाणी टंचाईची समस्या कमी प्रमाणात जाणवेल, असा अंदाज वर्तवण्यात आला होता; मात्र हळूहळू उष्मा वाढू लागला आहे. कडाक्याच्या उन्हामुळे उपलब्ध पाण्याचे जलस्रोत आटत चालले आहेत. यंदा टंचाई आराखड्यात १७ गावे ४४ वाड्यांचा समावेश करण्यात आला असला तरी ही गाववाड्यांची संख्या वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. टंचाईग्रस्त गाववाड्यांना चोरद नदीपात्रातून पाणीपुरवठा केला जातो. सद्यःस्थितीत चोरद नदीपात्रात मुबलक प्रमाणात पाणीसाठा असल्यानेही प्रशासनासह ग्रामस्थांसाठी समाधानकारक बाब आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:12 AM 11/Feb/2025