मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेला ब्रेक !

मुंबई : राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना विविध तीर्थस्थळांना भेटी देण्यासाठी अर्थसहाय्य करणारी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना राज्य सरकारने स्थगित ठेवण्याचे ठरविले आहे. विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर जाहीर केलेल्या विविध कल्याणकारी योजनांमुळे राज्य सरकारच्या तिजोरीवर मोठा ताण आला असल्याने निधीअभावी ही योजना स्थगित करण्याची वेळ राज्य सरकारवर आल्याची चर्चा आहे.

या योजनेअंतर्गत राज्यातील ज्येष्ठ नागरिकांच्या अयोध्येसाठी अजून १३ यात्रा प्रस्तावित आहेत. तथापि यासाठी आणखी २५ कोटी लागणार आहे. राज्य सरकारने यासाठी निधी न दिल्यामुळे या १३ ही यात्रा स्थगित करण्यात आल्या आहेत. तसेच ओडिशातील पुरीसाठी एक यात्रा नियोजित होती तीदेखील निधी अभावी स्थगित करण्यात आली आहे.

गेल्या वर्षी जुलै ते ऑक्टोबर या कालावधीत तीर्थ दर्शन योजना अंतर्गत ६ हजार ४२४ ज्येष्ठ नागरिकांनी अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या ९ यात्रांमध्ये सहभाग घेतला. पण निवडणुकीनंतर केवळ एकच यात्रा पार पडली. त्यामध्ये नागपूरच्या ८०० लाभार्थ्यांचा समावेश होता. दरम्यान, शिवभोजन थाळी आणि आनंदाचा शिधा या योजनाही बंद करण्याचा विचार शासकीय पातळीवर सुरू आहे. या योजनांवर आतापर्यंत चालू आर्थिक वर्षात १ हजार ३०० कोटी रुपये खर्च केले आहेत. सरकार या योजना पूर्णपणे बंद करेल की त्यामध्ये काही बदल करून त्या सुरू ठेवणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:43 11-02-2025