रत्नागिरी : दरवर्षी रत्नागिरी जिल्हा परिषदेचे अधिकारी व कर्मचारी यांच्या वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात येते. यावर्षीही जिल्हा परिषदेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे वार्षिक स्नेहसंमेलन १४ ते १६ फेब्रुवारी या कालावधीत आयोजित करण्यात आले आहे.
जिल्हा परिषदेच्या २९ व्या वार्षिक स्नेहसंमेलनाचे उद्घाटन व जिल्हा परिषद अधिकारी व कर्मचारी तसेच पंचायत समिती अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी आयोजित केलेल्या विविध स्पर्धांच्या बक्षीस वितरणाचा मुख्य कार्यक्रम शुक्रवारी (१४ फेब्रुवारी) रोजी सकाळी ११.३० वाजता राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री तथा रत्नागिरीचे पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांच्या हस्ते आणि गृह (शहरे), महसूल, ग्राम विकास आणि पंचायत राज, अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण, अन्न व औषध प्रशासन राज्यमंत्री योगेश कदम, खासदार नारायण राणे, खासदार सुनील तटकरे, आमदार भास्कर जाधव, आमदार शेखर निकम, आमदार किरण (भैया) सामंत, जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, प्रशासक तथा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी किर्ती किरण पुजार, धनंजय कुलकर्णी, पोलीस अधीक्षक यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.
१४ फेब्रुवारी रोजी सकाळी १०.३० वाजता पाककला स्पर्धा होणार असून, दुपारी ११.३० ते १.३० या वेळेत जिल्हा परिषद अधिकारी व कर्मचारी तसेच पंचायत समिती अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी आयोजित केलेल्या विविध स्पर्धांच्या बक्षीस वितरणाचा मुख्य कार्यक्रम होईल. सायंकाळी ७ ते १० या वेळेत जिल्हा परिषद अधिकारी, कर्मचारी तसेच पंचायत समिती अधिकारी, कर्मचाऱ्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम होतील.
१५ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ वाजता सत्यनारायण महापूजा, सकाळी १०.३० वाजता आरती व भजन तसेच सकाळी ११ ते दुपारी १ या वेळेत जिल्हा परिषद अधिकारी व कर्मचारी बंधू- भगिनींसाठी फनीगेम्स व दुपारी १.३० वाजता जिल्हा परिषदेचे अधिकारी व कर्मचारी बंधू-भगिनींसाठी स्नेहभोजनाचे आयोजन केले आहे. सायंकाळी ७ ते १० या वेळेत जिल्हा परिषद अधिकारी व कर्मचारी बंधू-भगिनी यांचा मराठी व हिंदी गाण्यांचा सदाबहार वाद्यवृंद (ऑर्केस्ट्रा) चे आयोजन करण्यात आले आहे.
१६ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ ते १ या वेळेत जिल्हा परिषद रत्नागिरीचे माजी पदाधिकारी, माजी जिल्हा परिषद सदस्य व जिल्हा परिषद रत्नागिरी मुख्यालय मधून सेवानिवृत्त झालेले अधिकारी/कर्मचारी यांच्या स्नेहमेळावा होईल. सायंकाळी ७ ते १० या वेळेत जिल्हा परिषद अधिकारी, कर्मचारी तसेच पंचायत समिती अधिकारी, कर्मचारी यांचे सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
जिल्हा परिषदेच्या वतीने १४, १५ आणि १६ फेब्रुवारी रोजी आयोजित केलेल्या २९ व्या वार्षिक स्नहसंमेलनानिमित्त विविध कार्यक्रमांचा सर्वांनी आस्वाद घ्यावा, असे आवाहन जिल्हा परिषद रत्नागिरीचे प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी किर्ती किरण पुजार, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी परिक्षित यादव, उपमुख्य कार्यकारी अधिकारी(साप्र) व प्रभारी प्रकल्प संचालक, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, रत्नागिरी विजयसिंह जाधव, रत्नागिरी जिल्हा परिषद कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष दिनेश सिनकर व मंडळाचे सचिव किरण वाडेकर यांनी केले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:54 PM 11/Feb/2025









