राजापूर तालुक्याला टंचाईमुक्त करण्याचा निर्धार

राजापूर : मुबलक प्रमाणात पाऊस पडूनही दरवर्षी तीव्र पाणीटंचाईची झळ पोहोचून टंचाईग्रस्त गावांमध्ये टँकर धावत असलेल्या तालुक्याला टंचाईमुक्त करण्याचा निर्धार करण्यात आला. आमदार किरण सामंत यांच्या नेतृत्वाखाली पंचायत समितीने तालुक्याचा टँकरमुक्त संभाव्य पाणीटंचाई आराखडा तयार केला आहे. गेल्या दशकभरामध्ये पहिल्यांदा असा आराखडा तयार केला असून, त्यामध्ये संभाव्य टैंकरग्रस्त गावांना पाणीटंचाईच्या काळामध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याऐवजी विहीर खोदणे, नळपाणीपुरवठा योजना दुरुस्ती, विहिरीत गाळ उपसा वा दुरुस्ती, विंधन विहीर दुरुस्ती आदी विविध स्वरूपाची कामे करून टँकरमुक्त गावे करण्यावर भर दिल्याची माहिती गटविकास अधिकारी नीलेश जगताप यांनी दिली.

राजापूर तालुक्याचा तब्बल १०२.६० लाख रुपयांचा टंचाईमुक्त संभाव्य पाणीटंचाई आराखडा तयार करण्यात आला आहे. त्यामध्ये विविध स्वरूपाच्या ६३ कामांचा समावेश करण्यात आला आहे.

यामध्ये नळपाणीपुरवठा योजना दुरुस्ती, विहिरीत गाळ उपसा वा दुरुस्ती, विंधन विहीर दुरुस्ती, अशा स्वरूपाची कामे असली तरी १७ गावे आणि ५० वाड्यांमधील विहीर खोदाईची ५७लाख ६० हजार रुपयांची सर्वाधिक ४८ कामांचा समावेश आहे.

तालुक्याच्या संभाव्य पाणीटंचाई आराखडा बैठकीमध्ये आमदार सामंत यांनी टँकरमुक्त तालुका करण्याचा निर्धार व्यक्त केला होता. त्या अनुषंगाने संभाव्य पाणीटंचाई आराखड्यामध्ये विविध स्वरूपाच्या कामांचा समावेश करण्यात आला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:45 PM 11/Feb/2025