सांस्कृतिक कार्यक्रमांनी वाढवली क्षेत्रीय वैदिक संमेलनाची रंगत

रत्नागिरी : येथे तीन दिवस पार पडलेल्या क्षेत्रीय वैदिक संमेलनाची रंगत सांस्कृतिक कार्यक्रमांनी वाढविली. उज्जैन येथील महर्षि सान्दीपनी राष्ट्रीय वेदविद्या प्रतिष्ठान आणि रामटेक येथील कविकुलगुरू संस्कृत विश्वविद्यालयाचे रत्नागिरी उपकेंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने तीन दिवसांचे क्षेत्रीय वैदिक संमेलन रत्नागिरीत पार पडले.

त्यातील सलग २ दिवस सायंकाळी झालेल्या सांस्कृतिक कार्यक्रमांमुळे रंगत वाढली. पहिल्या दिवशी सायंकाळी रत्नागिरीतील सुप्रसिद्ध युवा गायक श्रीधर पाटणकर यांचा गायनसंध्या कार्यक्रम पार पडला. त्यांच्यासोबत तल्लीन करणारी साथसंगत असल्याने कार्यक्रमाच्या शोभेत आणखीनच भर पडली. कार्यक्रमाची सुरुवात श्रीधर पाटणकर यांनी नागेन्द्रहाराय त्रिलोचनाय या सुमधुर सस्वर स्तोत्राने केली. यानंतर विविध संस्कृती आणि संस्कृतशी निगडित गीतांचे त्यांनी सादरीकरण केले. या कार्यक्रमात प्रथमेश शहाणे यांच्या तबल्याचा नाद, पुष्कर सरपोतदार यांची पखवाजाची थाप व संतोष आठवले यांच्या संवादिनीचा सूर या तिघांच्या मिलाफाने गायक श्रीधर पाटणकर यांनी गायलेल्या ‘स्वामी कृपा कधी करणार’ या भैरवीने उपस्थितांच्या मनाचा ठाव घेतला. संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी सायंकाळी रत्नागिरी संस्कृत उपकेंद्राचा नाट्यशास्त्र विभाग आणि योग विभाग यांनी संयुक्तपणे सादरीकरण केले. सांस्कृतिक कार्यक्रमाची सुरुवात नाट्यशास्त्र विभागातील चिन्मय जोशी यांच्या हिंदीतील गणेशवंदनेने झाली. यानंतर रत्नागिरीतील गोगटे-जोगळेकर महाविद्यालयातील संस्कृत विभागाच्या विद्यार्थिनींनी गणेशगीत गात त्यावर नृत्य केले. रत्नागिरी संस्कृत उपकेंद्राच्या योग विभागाच्या वतीने एक योग प्रात्यक्षिक सादर करण्यात आले. त्यात बी ए योगशास्त्र आणि एम योगशास्त्र या अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. संपूर्ण प्रात्यक्षिकाचे संयोजन उपकेंद्रातील प्रा. अक्षय माळी यांनी केले होते. यानंतर नाट्यशास्त्र विभागातील एकपात्री (गांधारी हिंदी) तेजस्विनी जोशी हिने सादर केले. इतिहासावर आधारित ‘उत्तरक्रिया’ नाटकातील व्यक्तिरेखा रुची पाष्टे हिने लीलया साकारली. नटसम्राट नाटकातील व्यक्तिरेखा, शिवाय एकपात्री अंतू बर्वा नाट्यशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. शशांक पाटील यांनी उत्कृष्टपणे सादर केला. गीतगायन चिन्मय जोशी यांनी केले, तर विनोदी मात्र प्रबोधनपर काव्यवाचन तेजस्विनी जोशी यांनी केले. महाराष्ट्राची लोकधारा या कार्यक्रमाची सुरुवात कैलास दामले यांच्या ढोलकीवादनाने झाली. यानंतर डॉ. पाटील, तेजस्विनी जोशी यांनी गोंधळ सादर केला. गोंधळ गीत चिन्मय जोशी आणि जोगवानृत्य रुची पाष्टे आणि प्रसिद्ध ‘भारूड बुरगुंडा होईल ग’ गीतासाठीडॉ. शशांक पाटील, ढोलकी कैलास दामले, आणि हार्मोनियमसाठी हर्षवर्धन होते. विश्वविद्यालयाची विद्यार्थिनी गौरी मुळे यांनी संस्कृत एकपात्री सादर केले. या कार्यक्रमावेळी कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाचे कुलगुरू प्रो. हरेराम त्रिपाठी,रत्नागिरी संस्कृत उपकेंद्राचे संचालक डॉ. दिनकर मराठे, निवृत्त प्रा. गणेश थिटे, प्रा. अंबरीष खरे आणि सर्व वैदिक मान्यवर होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:32 12-02-2025