चिपळुणात १५ फेब्रुवारीला गिरणी कामगारांचा मेळावा

चिपळूण : सर्व श्रमिक संघटनांच्या वतीने गिरणी कामगार त्यांचे वारसदार व कर्मचारी भविष्य निर्वाह निधी म्हणजेच ईपीएस ९५ निवृत्ती वेतन धारकांचा संयुक्त मेळावा शनिवार दि. १५ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वा. शहरातील विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक भवन येथे आयोजित करण्यात आला आहे. महाराष्ट्र शासनाने १५ मार्च २०२४ रोजी शासन निर्णय जारी करून गिरणी कामगार व त्यांच्या वारसदारांचा मुंबईत घरे देऊन पुनर्वसन करण्याचा अधिकार काढून घेण्यात आला आहे. त्याऐवजी एमएमआरडीएच्या क्षेत्रात घरे देण्यासंबंधी धोरण जाहीर केले आहे.

यानुसार ठाणे जिल्ह्यातील शेलू तसेच वांगणी येथे पडिक जमिनीवर गिरणी कामगारांची घरे देण्यासंबंधी विकासकामांची नेमणूक केलेली आहे. आजही मुंबईच्या एनटीसी गिरण्यांच्या जमिनी उपलब्ध आहेत. इतरही जमिनी आहेत. त्या बिल्डरांना द्यायच्या व गिरणी कामगार व वारसदारांना ग्रामीण भागात पडिक जमिनीवर घरे द्यायची, या धोरणाविरोधात आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशन काळात मुंबईत तीव्र आंदोलन करण्याची रूपरेषा या मेळाव्यात जाहीर करण्यात येणार आहे. तसेच भविष्य निर्वाह निधीमधील निवृत्ती धारकांची फसवणूक केली जात असल्याबाबतची माहिती देण्यात येणार आहे. यावेळी मार्गदर्शनासाठी विजय कुलकर्णी, बी. के. आंब्रे, संतोष मोरे उपस्थित राहणार आहेत. यावेळी उपस्थित राहावे, असे आवाहन सर्व श्रमिक संघटनेतर्फे करण्यात आले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:01 AM 12/Feb/2025