चिपळुणात वारंवार वीजपुरवठा खंडित

चिपळूण : महावितरण कंपनीमार्फ मार्च एण्डच्या पार्श्वभूमीवर ध्वनीक्षेपकामार्फत उद्घोषणा केली जात आहे व लोकांना ‘वीज बिल भरा, कारवाई टाळा’, असे आवाहन केले जात आहे. मात्र, सातत्याने वीजपुरवठा खंडीत होत असून त्यात महावितरणकडून कोणतीही सुधारणा होताना दिसून येत नाही. त्यामुळे महावितरणचा ग्राहक तीव्र नाराजी व्यक्त करीत आहे.

चिपळूण, सावर्डे, गुहागर परिसरात दररोज विजेचा खेळखंडोबा सुरू आहे. दिवसातून आठ ते दहावेळा वीजपुरवठा खंडीत होत आहे. दररोज सायंकाळी ४ वाजण्याच्या आसपास वीजपुरवठा खंडित होतो. याचे कारण मात्र गुलदस्त्यात आहे. सद्यस्थितीत विजेची मागणी वाढलेली नसताना आणि हिवाळा सुरू असताना, या शिवाय भारनियमनसारखा प्रकार नसताना देखील सातत्याने वीजपुरवठा खंडीत केला जात आहे. दिवसभरात अनेकवेळा वीजपुरवठा गायब होतो.

यामुळे प्रतिकूल परिणाम होत आहे. शहर परिसरातील व्यापारी, उद्योजक यांच्यावर यामुळे विपरित परिणाम होत असून, अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. सातत्याने वीजपुरवठा खंडित होत असल्याने बँका, विविध शासकीय कार्यालये यामध्ये अडचण निर्माण होत आहे. काहीवेळा सातत्याने वीज खंडित झाल्याने आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. विजेची अनेक उपकरणे यामुळे निकामी होत असून, महावितरणने कामकाजात सुधारणा करावी, अशी मागणी होत आहे. याबाबत दखल न घेतल्यास वीज ग्राहक आंदोलनाच्या तयारीत आहेत.

वीजबिल ग्राहकांमध्ये भेदभाव का?
अनेकवेळा अत्यल्प थकबाकी असणाऱ्या ग्राहकांची वीज जोडणी कापली जात आहे तर हजारोंच्या पटीत वीज बिल थकीत असलेल्यांना महावितरणकडून संरक्षण मिळत आहे. त्यामुळे वीज बिल ग्राहकांमध्ये असा भेदभाव का? असा सवालही केला जात आहे. चिपळूण, गुहागर परिसरातील खंडीत होणारा वीजपुरवठा सुरळीत करावा; अन्यथा वीज ग्राहक कार्यालयावर आंदोलन छेडतील, असा इशारा वीज ग्राहकांकडून देण्यात येत आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:37 AM 12/Feb/2025