जिद्द, चिकाटी, मेहनत हाच यशाचा खरा मार्ग : डॉ. दीपक रावेरकर

मंडणगड : यश कधीही अपघाताने मिळत नाही, तर चिकाटी, जिद्द व मेहनत हाच यशस्वी होण्याचा खरा मार्ग आहे. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी शिक्षणाबरोबरच विविध प्रकारची कौशल्ये आत्मसात करावीत. कारण कौशल्यहीन शिक्षण हेच बेरोजगारीचे मुख्य कारण आहे, असे प्रतिपादन पोलादपूरच्या सुंदरराव मोरे महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ. दीपक रावेरकर यांनी केले. येथील सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळाच्या लोकनेते गोपीनाथ मुंडे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या वार्षिक पारितोषिक वितरण समारंभात प्रमुख पाहुणे ते म्हणून बोलत होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सहकार्यवाह विश्वदास लोखंडे होते. कार्यक्रमास संस्थेचे कोषाध्यक्ष रवींद्रकुमार मिश्रा, सहकोषाध्यक्ष सुनीलभाई मेहता, डॉ. प्रभाकर पेंडसे, ज्योती रावेरकर, आबासाहेब हुलगे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राहुल जाधव, उपप्राचार्य डॉ. वाल्मीक परहर आदी उपस्थित होते.

ते म्हणाले, शहरी भागातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साधने तसेच चांगले शैक्षणिक वातावरण मिळते. परंतु ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना या गोष्टी मिळत नाही. आज विज्ञान व तंत्रज्ञानाच्या युगामध्ये इंटरनेट व युट्युब सारख्या माध्यमांचा योग्य वापर करुन विद्यार्थ्यांनी ज्ञान आत्मसात करावे. आपले शिक्षण अर्धवट न सोडता शिक्षण पूर्ण करण्यास प्राधान्य द्यावे. तरच विकसित भारताचे स्वप्न साध्य होईल.

संस्थेचे सहकार्यवाह विश्वदास लोखंडे म्हणाले, ग्रामीण भागामधील विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्ता ओतप्रोत भरलेली असून आपणास मिळणाऱ्या सर्व संधींचा योग्य उपयोग करुन विद्यार्थ्यांनी ज्ञान व कौशल्ये आत्मसात करावीत. येथील सर्वच शिक्षक विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण प्रगतीसाठी सतत प्रयत्नशील असतात. विद्यार्थ्यांनी त्याचा योग्य उपयोग करुन घेतला पाहिजे. गगनभरारीचे वेड प्रत्येक विद्यार्थ्यांच्या रक्तामध्ये असले पाहिजे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:45 AM 12/Feb/2025