संजू सॅमसन दुखापतीमुळे काही काळ क्रिकेटपासून दूर होता. इंग्लंडविरुद्धच्या टी२० मालिकेदरम्यान त्याला दुखापत झाली होती. त्याच्या हाताच्या बोटावर नुकतीच यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली.
दुखावलेल्या बोटावर शस्त्रक्रिया झाल्यानंतर डॉक्टरांच्या संपूर्ण टीमसह हॉस्पिटलमधून संजू सॅमसनचा पहिला फोटो समोर आला आहे. हा फोटो सोशल मीडियावर व्हायरलदेखील होत आहे. या ऑपरेशननंतर सॅमसनच्या IPL 2025 मध्ये खेळण्यावरही प्रश्न उपस्थित केले जात आहेत. सॅमसनला बरे होण्यासाठी किती वेळ लागेल? तो आयपीएल २०२५ पर्यंत बरा होऊ शकेल का? असा सवाल राजस्थान रॉयल्सचे चाहते विचारू लागले आहेत.
दुखापत कधी झाली?
संजू सॅमसनच्या हाताच्या बोटाला मुंबईत इंग्लंडविरुद्ध खेळल्या गेलेल्या पाचव्या टी२० सामन्यादरम्यान दुखापत झाली होती. इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरचा एक वेगवान चेंडू सॅमसनच्या बोटाला लागला ज्यामुळे त्याला फ्रॅक्चर झाले होते. त्यानंतर त्याला शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला गेला होता. त्यानुसार संजू सॅमसनच्या हाताच्या बोटावरील शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली.
इंग्लंड विरुद्ध सॅमसनची कामगिरी
संजू सॅमसन इंग्लंडविरुद्ध खेळलेल्या सर्व ५ टी२० सामन्यांचा भाग होता. त्याने बॅटने काही विशेष कामगिरी केली नाही. त्याला ५ सामन्यात फक्त ५१ धावा करता आल्या. या काळात त्याचा स्ट्राईक रेटही १२०च्या खाली होता. संजू सॅमसनच्या IPL मधील कामगिरीबद्दल बोलायचे झाले तर, त्याने आतापर्यंत खेळलेल्या १६८ सामन्यांमध्ये ४४१९ धावा केल्या आहेत. आयपीएल २०२४ मध्ये, त्याने राजस्थान रॉयल्ससाठी १५ डावात ५३१ धावा केल्या आहेत. तर भारतासाठी ५८ सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने एकूण १४७१ धावा केल्या आहेत. सॅमसनने भारतासाठी १६ एकदिवसीय आणि ४२ टी-२० सामने खेळले आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:26 12-02-2025














