रत्नागिरी : माजी आमदार राजन साळवी यांनी आता शिवसेना उपनेते पदाचा राजीनामा दिला आहे. आज रात्री राजन साळवी यांच्या शिंदे गटातील प्रवेशाबाबत शिंदे गटाची बैठक होणार आहे. या बैठकी नंतर उद्या ३ वाजता ठाणे येथे राजन साळवी यांचा शिवसेनेत प्रवेश होणार असल्याची माहिती मिळत आहे.
मागील अनेक दिवसांपासून राजन साळवी हे नाराज होते. आपली नाराजी त्यांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे बोलून दाखविली होती. त्यानंतर ते भाजप मध्ये जाणार असल्याची चर्चा देखील रंगली होती. मात्र या चर्चेवर मंत्री रवींद्र चव्हाण यांनी पडदा टाकला होता. दोन दिवसांपूर्वी त्यांचा शिंदे गटात प्रवेश होणार होता मात्र त्याला काही कारणांमुळे खीळ बसली होती. आता मात्र राजन साळवी यांच्या प्रवेशाचा मार्ग मोकळा झाल्याचे दिसत आहे. म्हणूनच माजी आमदार राजन साळवी यांनी आपला उपनेते पदाचा राजीनामा देखील दिला आहे. उद्या दुपारी ३ वाजता राजन साळवी यांचा शिंदे गटात प्रवेश होणार आहे.
राजन साळवी यांनी शिवसेना उपनेता पदाचा राजीनामा दिल्याने उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. विधानसभा निवडणुकीतील पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारत त्यांनी हा राजीनाम दिला. राजन साळवी शिंदे गटात जाण्याच्या चर्चेने राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. ही घडामोड उद्धव ठाकरे गटासाठी कोकणातील एक मोठी खिंडार ठरू शकते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:42 12-02-2025














