Ratnagiri : शारदीय नवरात्रौत्सवास आजपासून प्रारंभ

रत्नागिरी : दि. ३ ऑक्टोबर रोजी घटस्थापनेने नवरात्रौत्सवाला प्रारंभ होणार आहे. सार्वजनिक नवरात्रौत्सव मंडळाची तयारी पूर्ण झाली असून काही मंडळांच्या देवींचे बुधवारीच आगमन झाले आहे. नवरात्रौत्सवाच्या पार्श्वभूमीवर बाजरपेठेतही सर्वच साहित्याची रेलचेल वाढली आहे. जिल्ह्यात ४८७ मूर्तीची प्रतिष्ठापना तर ९० ठिकाणी प्रतिमा पूजन करण्यात येणार आहे. त्याचबरोबर गावागावात सुद्धा ग्रामदेवतेच्या देवळात नवरात्रौत्सव साजरा होत असून गावागावातील मंदिरांची फुले, रांगोळी व विद्युत रोषणाईने सजावट केलेली आहे.

आनंद व मांगल्याचे प्रतीक असलेल्या दुगदिवीची प्रतिष्ठापना जवळ आल्याने भक्तांमध्ये उत्साह वाढला आहे. सर्वपित्री अमावास्येने पितृपक्षाची सांगता होत आहे. दुसऱ्याच दिवशी गुरुवार दि. ३ ऑक्टोबर रोजी घटस्थापनेने नवरात्रौत्सवाला प्रारंभ होणार असल्याने अवघे जनजीवन आतूर झाले आहे. बुधवारी सायंकाळी अनेक मंडळांची तयारी पूर्ण झाल्याचे दिसून आले. मंडप उभारणी, सजावट, विद्युत रोषणाई, देखावे आदी कामे पूर्णत्वाकडे आली आहेत. घटस्थापनेला होणारी गर्दी व अडथळ्यांच्या पार्श्वभूमीवर उत्सवापूर्वीच काही नवरात्रौत्सव मंडळांच्या मूर्ती मंडपामध्ये दाखल झाल्या आहेत. ग्रामीण भागातही मंदिरांमध्ये घटस्थापनेची जय्यत तयारी करण्यात आली आहे. मंदिरांची रंगरंगोटी आणि आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.

घटस्थापनेचा शुभमुहूर्त…
अश्विन शुक्ल तृतीया तिथीची वृद्धी झाल्याने यावर्षी नवरात्रौत्सव दहा दिवसांचा असणार आहे. गुरुवार दि. ३ ऑक्टोबर रोजी ब्रह्म मुहूर्तापासून म्हणजेच पहाटे ५ वाजल्यापासून दुपारी १.४५ मिनिटांपर्यंत घटस्थापनेसाठी शुभमुहूर्त आहे. या शुभकाळादरम्यानच्या वेळेत घटस्थापना करून नवरात्रीतील पूजन करता येईल. दि. ११ ऑक्टोबरला दुर्गाष्टमी व नवमीला उपवास सुटणार असून, दि. १२ ऑक्टोबर रोजी सीमोल्लंघनाने विजयादशमी साजरी होणार आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:20 AM 03/Oct/2024