चिपळूण : कळवंडे माडवाडीत १२ कोळसाभट्ट्या उद्ध्वस्त

चिपळूण : टेरव येथे वन विभागाने कोळसा भट्टया उद्ध्वस्त केल्यानंतर आता या व्यावसायिकांनी आपले बस्तान अन्यत्र हलविले आहे. तालुक्यातील कळवंडे माडवाडी या ठिकाणी दोन दिवस केलेल्या कारवाईत बारा कोळसा भट्टया वन विभागाने उद्ध्वस्त केल्या असून, १८ घनमीटर लाकूड जप्त करण्यात आले आहे. या प्रकरणी अज्ञातांवर गुन्हा दाखल झाला आहे.

कोकणात कोळसा भट्टया लावण्यास न्यायालयाने बंदी घातलेली असताना देखील गेली अनेक वर्षे शहराजवळच्या टेरव येथील जंगलात कोळसा भट्टया धगधगत होत्या. यावर्षी वन विभागाने या कोळसा भट्टया उद्ध्वस्त केल्या व सातत्याने कारवाईचे सत्र सुरू ठेवले आहे.

त्यामुळे आता या व्यावसायिकांनी आपले बस्थान अन्यत्र हलविले आहे. ज्या गावात झाडेतोड बंदी आहे, गुरे मोकाट सोडण्यास बंदी घालण्यात आली आहे अशा कळवंडे या आदर्श गावात वन विभागाला कोळसा भट्टया आढळून आल्या आहेत. मंगळवारी (दि. ११) रात्री केलेल्या कारवाईत वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी धगधगत असलेल्या आठ कोळसा भट्टया उद्ध्वस्त केल्या व त्यातील सहा घ.मी. लाकूड जप्त करण्यात आले.

ही कारवाई ताजी असतानाच वन विभागाला मिळालेल्या माहितीनुसार काल (दि.१२) सकाळी पुन्हा कळवंडे येथे माडवाडी येथील जंगलात लाकडे रचून ठेवलेल्या चार भट्टया पोलिसांना आढळून आल्या. त्या भट्टया उद्ध्वस्त करून १२ घनमीटर लाकूड वन विभागाने जप्त केले आहे. यामुळे आता बेकायदेशीरपणे कोळसा भट्टया लावणारे वन विभागाच्या कारवाईवर लक्ष ठेवून असून, आपले बस्तान वेगवेगळ्या ठिकाणी मांडत आहेत.

त्यामुळे आगामी काळात वन विभागासमोर आव्हान असणार आहे. कळवंडे येथील पोलिस पाटील अनंत उदेग यांनी वन विभागाला या बाबत माहिती कळविली. यानंतर ही कारवाई करण्यात आली. येथील विभागीय वनाधिकारी सौ. गिरीजा देसाई, सहाय्यक वनाधिकारी प्रियांका लगड, परिक्षेत्र वनाधिकारी सरवर खान, वनपाल सताप्पा सावंत, वनपाल राजाराम शिंदे, राहूल गुंठे, श्री. आंबवकर आदी कर्मचाऱ्यांनी ही कारवाई यशस्वी केली. त्यामुळे आता बेकायदेशिरपणे कोळसा भट्ट्या चालविणारे धास्तावले आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:06 AM 13/Feb/2025