मुंबई : कोकणातील राजापूर विधानसभेचे माजी आमदार राजन साळवी यांनी शिवबंधन तोडत शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. ठाण्यातील आनंद मठाजवळ एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राजन साळवी यांचा शिवसेनेत प्रवेश झाला.
राजन साळवींनी हाती धनुष्यबाण घेत शिवसेनेत प्रवेश केला. एकनाथ शिंदे यांनी राजन साळवी यांच्या गळ्यात शिवसेना शिंदे गटाचे उपरण घातलं आणि राजन साळवींचा शिंदे गटाचा प्रवेश झाला. राजन साळवींसोबत कोकणातील असंख्य पदाधिकाऱ्यांनीही शिंदे गटात प्रवेश केला. यामुळे ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे.
राजन साळवी यांचा पक्षप्रवेश सोहळा हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत पार पडला. राजन साळवी यांच्या पक्ष प्रवेशापूर्वी एक महत्त्वाची बैठक पार पडली होती. या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आमदार किरण सामंत आणि राजन साळवी उपस्थित होते. “एकनाथ शिंदे हे माझे पहिल्यापासून गुरु होते. मागच्या काळात त्यांच्यासोबत मी जाऊ शकलो नाही. पण जाण्यासाठी निमित्त लागतं. ते निमित्त लागलं, मी या ठिकाणी आलो. शिंदे साहेबांचा आशिर्वाद घेतला” असं राजन साळवी यांनी या बैठकीनंतर म्हटले होते.
तसेच त्यांनी पत्रकार परिषद घेत शिवसेना ठाकरे गट सोडण्याचे कारणही सांगितले होते. ‘मी बाळासाहेबांचा लाडका शिवसैनिक आहे. त्यांना अभिप्रेत असलेले काम मी आजपर्यंत केले आणि त्यांच्याच विचारांचे काम मी पुढे नेणार आहे. माझ्या पराभवाला जी मंडळी कारणीभूत आहेत, त्या संबंधीची माहिती, पुरावे मी उद्धव ठाकरे यांच्याकडे दिले. त्यानंतर वाटलं आता थांबाव, पण मतदारसंघातील माणसं, त्यांचा विकास, जिल्ह्याचा विकास यासाठी मी पुन्हा उमेदीने उभं राहिलं पाहिजे असं आग्रह या मंडळींनी धरला. विकासाच्या दृष्टीने विचार करता एकनाथ शिंदे यांचं नेतृत्व महाराष्ट्राने स्वीकारलं आहे. त्यांच्या नेतृत्वात पुन्हा एकदा शिवसेना, धनुष्यबाण घेऊन लोकांमध्ये जाऊ’ असे राजन साळवींनी म्हटले.
कोण आहेत राजन साळवी?
राजन साळवी हे राजापूर विधानसभेचे तीन वेळा आमदार होते. भारतीय विद्यार्थी सेनेपासून त्यांनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. १९९३ ते ९४ च्या सुमारास ते शिवसेनेत सक्रीय झाले. त्यांनी पहिल्यांदा शिवसेनेचे नगराध्यक्षपद भूषवलं होतं.
राजन साळवींनी रत्नागिरी जिल्ह्याचे जिल्हाप्रमुखपदही सांभाळलं होतं. २००९ मध्ये राजापूर विधानसभा मतदारसंघातून पहिल्यांदा विधानसभेवर निवडून आले. २००९ आणि २०१४ मध्येही राजन साळवी हे विधानसभेत विजयी झाले. २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत उदय सामंतांचे बंधू किरण सामंतांकडून राजन साळवींचा पराभव झाला. त्यांनी पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारत उपनेतेपदाचा राजीनामा दिला होता. विधानसभा निवडणुकीत विनायक राऊतांनी मदत न केल्याचा आरोप राजन साळवींनी केला होता. अवैध मालमत्ताप्रकरणी एसबीकडून राजन साळवींच्या घरी छापेमारी करण्यात आली होती.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:48 13-02-2025














