जयगड : नांदिवडे येथील जिंदलच्या गॅस टर्मिनलची जागा स्थलांतरित करण्याची मागणी

गणपतीपुळे : रत्नागिरी तालुक्यातील जयगड नजीकच्या नांदिवडे येथे जिंदल कंपनीच्या माध्यमातून उभारण्यात येत असलेल्या गॅस टर्मिनलची जागा स्थलांतरित करण्याची मागणी येथील ग्रामस्थांकडून होत आहे. याबाबत नांदिवडे येथील प्रदूषण विरोधी संघर्ष कृती समितीकडून रत्नागिरीच्या जिल्हाधिकाऱ्यांना लेखी निवेदन देण्यात आले आहे.

या निवेदनात म्हटले आहे की, नांदिवडे अंबूवाडी फाटा या ठिकाणी गॅस टर्मिनल उभारण्याचे काम काम जिंदल उद्योग समुहाच्या माध्यमातून सुरू आहे. हा प्रकल्प उभा करीत असताना ग्रामपंचायतीची कोणतीही परवानगी घेतलेली नाही. या उलट १९ डिसेंबर २०२४ रोजी झालेल्या विशेष ग्रामसभेत व २६ जानेवारी रोजी झालेल्या ग्रामसभेत बहुमताने हा प्रकल्प नियोजित जागेवर होऊ नये, असा ठराव करण्यात आला आहे.

त्या ठरावाची प्रत या अर्जासोबत जोडण्यात आलेली आहे. जिंदल उद्योग समुहाने १९९३ साली स्टील कारखाना उभा करण्यासाठी स्थानिकांकडून जमिनी खरेदी केल्या. लोकांनी देखील चांगल्या भविष्याचा विचार करून जागा दिल्या; मात्र आज या संदर्भात स्थानिक लोकांची पूर्णपणे निराशा झाली आहे. सर्वप्रथम कंपनीने जिंदल एनर्जी हा प्रकल्प सुरू केला त्यातून निर्माण होणाऱ्या राखेमुळे आज पंचक्रोशीतील बागायती अडचणीत आहेत. जिंदल पोर्ट सुरू करून खोल समुद्रात जेटी बांधण्याचे काम केले. त्यामुळे स्थानिक मच्छीमार अडचणीत आले. तसेच कंपनीच्या बॉयलरमधून निघणाऱ्या दूषित पाण्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न ऐरणीवर आहे. १२ डिसेंबर २०२४ रोजी नांदिवडे प्रशालेशेजारी कंपनी परिसरात असणाऱ्या गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरमधून वायुगळतीचा प्रकार प्रकार घडला. याचा त्रास मोठ्या प्रमाणात शालेय विद्यार्थ्यांना झाला. अशातच कंपनी जे गॅस टर्मिनल उभे करण्याचे काम करीत आहे. त्याच्या २०० मीटर इतक्या कमी अंतरावर स्थानिक लोकवस्ती मोठ्या प्रमाणात आहे. या प्रकल्पाबद्दल येथील लोकांच्या मनात भीतीदायक वातावरण आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
09:59 AM 14/Feb/2025