Ratnagiri : कृषी लिपिक अधिकारी, कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन

रत्नागिरी : कृषी लिपिक संवर्गीय पदावर तांत्रिक अधिकाऱ्यांची पदस्थापना करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्याच्या विरोधात कृषी लिपिक संवर्गातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन सुरू केले आहे. याबाबत मंगळवारी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे.

कृषी सहसंचालक (आस्थापना) हे पद लिपिक संवर्गीय प्रवर्गाचे आहे. मात्र, शासनाने या पदावर तांत्रिक अधिकाऱ्यांची पदस्थापना करून खुद्द आपल्याच निर्णयास बगल दिली. कृषी आयुक्तालयातील लिपिक संवर्गीय कृषी सहसंचालक (आस्थापना) हे पद मे २०२३ पासून रिक्त आहे. सेवा, शर्तीनुसार या पदावर वरिष्ठ प्रशासन अधिकारी ज्येष्ठतेनुसार पदोन्नतीस पात्र असतात. वरिष्ठ प्रशासन अधिकारी राजेश पोपटराव जाधव हे कृषी सहसंचालक (आस्थापना) या पदासाठी पात्र असताना ते पद रिक्त ठेवून शासनाने हेतुपुरस्सर त्यांना पदोन्नतीने अप्पर संचालक, वनामती, नागपूर या तांत्रिक पदावर पदस्थापना दिली. एक प्रकारे त्यांच्यावर अन्याय केला आहे.

या संदर्भात महाराष्ट्र राज्य कृषी विभाग लिपिक संवर्ग संघटनेने शासनासोबत पत्रव्यवहार केला. मात्र, शासनाने दखल घेतली नाही. सहसंचालक (आस्थापना) या पदाच्या सेवाशर्तीला बगल देऊन शासनाने तांत्रिक संवर्गातील दुसऱ्या अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांना पदोन्नतीने त्या पदावर पदस्थापना देत लिपिक संवर्गीय संघटनेच्या मागणीला केराची टोपली दाखविली. त्यामुळे संघटनेने २३ सप्टेंबरपासून आंदोलन सुरू केले आहे. शासनाच्या निर्णयाविरोधात लिपिक संवर्गीय सर्व अधिकारी, कर्मचारी २६ सप्टेंबरपासून कामबंद आंदोलनात सहभागी झाले आहेत.

याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले असून, यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष संदीप गुरव, उपाध्यक्ष वृषाली सावंतदेसाई, उदय कदम, संदेश गोठल, सुरेंद्र पत्याणे, महेश तेरेदेसाई, सुरेश चिकटे आदी उपस्थित होते.

कामकाज विस्कळीत
शासनाच्या निर्णयाविरोधात लिपिक संवर्गीय सर्व अधिकारी, कर्मचारी २६ सप्टेंबरपासून कामबंद आंदोलनात सहभागी झाले आहे. याचा कामावर विपरीत परिणाम होत असून, अनेक कामे खोळंबली आहेत. शासनाने याकडे लक्ष देत तातडीने मागण्या सोडवाव्या, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:10 AM 03/Oct/2024