रत्नागिरी : शहरानजीकच्या पानवल येथील डॉ. सीमा मेढे-कांबळे यांची थायलंडमधील महिदोल विद्यापीठाच्या आसियान इन्स्टिट्यूट फॉर हेल्थ डेव्हलपमेंट या आंतरराष्ट्रीय विद्यापीठामध्ये व्याख्याता म्हणून नियुक्ती झाली आहे. हे विद्यापीठ आरोग्य विकास, सार्वजनिक आरोग्य आणि संबंधित क्षेत्रांमध्ये संशोधन आणि शिक्षणासाठी जागतिक स्तरावर प्रसिद्ध आहे.
डॉ. सीमा यांनी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी येथून गृहविज्ञान या विषयात पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. त्यानंतर त्यांनी एशियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, थायलंड येथून अन्न, विज्ञान आणि तंत्रज्ञान या विषयात उच्च शिक्षण, पीएच.डी. संपादन केली.
डॉ. सीमा यांचे आंतरराष्ट्रीय दर्जाच्या नियतकालीक/जर्नल्समध्ये अनेक शोध निबंध प्रकाशित झाले आहेत. डॉ. सीमा ह्या थायलंड येथील चुलालोन्गकोर्न युनिव्हर्सिटी, थायलंड येथे पोस्ट डॉक्टरेट फेलो म्हणून कार्यरत होत्या. त्यांनी डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठांतर्गत मत्स्य महाविद्यालय, शिरगाव, येथील तीन विद्यार्थी, कृषी महाविद्यालय, दापोली येथील एका विद्यार्थ्याला चुलालोन्गकोर्न युनिव्हर्सिटीमध्ये एम.एसस्सी. या पदव्युत्तर पदवीसाठी, प्रवेशासाठी मार्गदर्शन केले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:49 AM 14/Feb/2025














