राजापूर येथील ओंकार पवारचे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या दोन परीक्षांमध्ये एकाच वेळी यश

रत्नागिरी : केळवली (ता. राजापूर) येथील ओंकार पवार या तरुणाने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या दोन परीक्षांमध्ये एकाच वेळी यश मिळविले आहे.

अभ्यासातील सातत्य व चिकाटी आणि समोर ठेवलेल्या ध्येयाचा सातत्याने केलेला विचार यामुळे मनाशी बाळगलेले ध्येय सहज गाठता येते.

त्यासाठी घेतलेले श्रम कधीही वाया जात नाहीत, हे केळवली उगवती ठोसरवाडी येथील ओंकार प्रकाश पवार या तरुणाने सिद्ध करून दाखवले आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या कर सहाय्यक व मंत्रालय सहाय्यक या दोन्ही परीक्षांमध्ये ओमकारने एकाच वेळी यश संपादन केले आहे.

गेली दहा वर्षे सातयाने पाठलाग करून, अपार मेहनत घेऊन ओंकारने या दोन्ही परीक्षा दिल्या होत्या. मंत्रालय सहायक परीक्षेत तो महाराष्ट्रातून २४ वा तर कोकण विभागात दुसरा आला आहे.

सुरुवातीला पोलीस उपनिरीक्षक बनण्याचे स्वप्न उराशी बाळगणाऱ्या ओंकारने पहिल्याच प्रयत्नात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची पूर्वपरीक्षा व मुख्य परीक्षाही उत्तीर्ण केली होती. मात्र मैदानी परीक्षेत उंची कमी भरल्याने त्याला त्याच्या या स्वप्नाने हुलकावणी दिली होती. मात्र, त्यानंतर हार न मानता ओंकारने उपजिल्हाधिकारी बनण्याचे स्वप्न बाळगत गेल्या दहा वर्षांत जवळजवळ वीस वेळा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची मुख्य परीक्षा दिली होती. यावेळी त्याने यशश्री खेचून आणली आहे. अतिशय सामान्य कुटुंबात जन्मलेल्या ओंकारने अतिशय मेहनत घेऊन हे यश संपादन केले आहे.

लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून असे यश मिळवणारा ओंकार पवार हा केळवली गावातील पहिलाच तरुण असल्यामुळे गावातून व परिसरातून त्याचे अभिनंदन करण्यात येत आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:27 14-02-2025