पर्यटनवाढीसाठी पावसमध्ये सोयीसुविधांचा अभाव

पावस : येथील स्वामी स्वरुपानंद समाधी मंदिरामुळे पावस पर्यटनक्षेत्राचे नाव जागतिक स्तरावर पोचलेले आहे. त्यामुळे वर्षभरामध्ये दोन लाखांहून अधिक पर्यटक पावसमध्ये येऊन जातात. या परिसरात पर्यटकांना थांबवून ठेवता येईल, अशा सोयीसुविधांचा अभाव आहे. परिणामी, पावस हे एक दिवसाचे पर्यटनक्षेत्र बनले आहे. पर्यटकांना आवश्यक सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या तर भविष्यात नक्कीच पर्यटक आकर्षित होतील आणि स्थानिकांना रोजगार उपलब्ध होईल, पावस येथील स्वामी स्वरूपानंद समाधी मंदिराला येणाऱ्या पर्यटकांना दर्शन, प्रसाद व राहण्याची व्यवस्था या व्यतिरिक्त कोणत्याही सोयीसुविधा उपलब्ध नाहीत, त्यामुळे पर्यटकांना थांबून परिसराचा आनंद लुटण्याचा प्रयत्न करता येत नाही, अशी स्थिती या क्षेत्रात आहे.

त्याचबरोबर पावस बसस्थानकातून मंदिराकडे येणारा रस्ता अरुंद असल्यामुळे तसेच सूचनाफलक नसल्यामुळे पर्यटकांची फार मोठी अडचण निर्माण होते. याकरिता मंदिर प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे आहे. येणान्या पर्यटकांच्या माध्यमातून या मंदिराला मोठ्या प्रमाणात देणगी प्राप्त होते. त्यामुळेच त्यांनी या समस्यांकडे लक्ष देणे गरजेचे आहे. पर्यटकांच्या माध्यमातून गावातील लोकांना व ग्रामपंचायतीला फायदा होत नाही. पर्यटक दर्शन करून निघून जातात. ते थांबू शकतील, अशा कोणत्याही सोयीसुविधा या परिसरात नाहीत.

पावस हे गाव स्वामीच्या समाधी स्थळामुळे प्रसिद्ध आहे. महाराष्ट्राच्या नव्हे, तर देशाच्या कानाकोपऱ्यातून पर्यटक येथे येतात. परंतु दर्शन घेतल्यानंतर पर्यटक गावात थांबत नाहीत, तसे पर्यटन प्रकल्प सुरू केले गेले तर त्यामधून स्थानिकांना रोजगाराचे साधन मिळेल, संतोष सामंत, ग्रामस्थ, पावस

स्वामीच्या समाधी मंदिरामुळे पावसची ओळख आहे. अनेक पर्यटक त्या दृष्टिकोनातून ग्रामपंचायतीमार्फत वेगवेगळे उपक्रम राबवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मंदिर प्रशासनाने लक्ष घातल्यास या सर्व गोष्टींना चांगली गती मिळेल. पावस बसस्थानक समाधी मंदिराकडे जाणारे रस्ते चांगल्या तऱ्हेने तयार करण्यात आले आहेत. पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी कोल्हापूर पद्धतीचा बंधारा घालण्यात आलेला आहे. हा परिसर लोकांना आवडतो त्यामुळे पर्यटकांनी येथे निवास करावा, यासाठी प्रयत्न केले जातील. – प्रवीण शिंदे, उपसरपंच, पावस

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:23 PM 14/Feb/2025