रसजिज्ञासा परिसंवादाला रत्नागिरीत प्रतिसाद

रत्नागिरी : आयुर्वेद व्यासपीठ शाखा रत्नागिरी आयोजित रसजिज्ञासा परिसंवाद झाडगाव येथील माधवराव मुळ्ये भवनात मोठ्या उत्साहात झाला.

उद्‍घाटन सत्रात मंचावर परिसंवादाचे मुख्य उद्‍घाटक आयुर्वेद व्यासपीठाचे केंद्रीय उपाध्यक्ष वैद्य मल्हार जोशी, परिसंवादातील वक्ते वैद्य नरहर प्रभू, वैद्य महेश ठाकूर, वैद्य समीर परांजपे, वैद्य पार्थ काळे, तसेच एमईएस आयुर्वेद महाविद्यालयाचे उपप्राचार्य वैद्य सचिन उत्पात उपस्थित होते. दीपप्रज्वलन आणि श्री धन्वंतरी पूजन करून परिसंवादाची सुरुवात झाली. वैद्य नेहा जोशी यांनी श्री धन्वंतरी स्तवन सादर केले. आयुर्वेद व्यासपीठ रत्नागिरी जिल्हा कार्यवाह वैद्य अमेय भावे यांनी प्रास्ताविक केले. यानंतर निवडक रसौषधी या रसकल्पांवर आधारित पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. वैद्य महेश ठाकूर यांनी मनोगत व्यक्त केले.‌ वैद्य मल्हार जोशी यांनी आयुर्वेद व्यासपीठ घेत असलेल्या विविध उपक्रमांविषयी माहिती दिली.‌ सूत्रसंचालन वैद्य मंदार भिडे यांनी केले.
प्रथम सत्रात वैद्य नरहर प्रभू यांनी कुपीपक्व रसायन औषधी अनुभव या अंतर्गत रससिंदूर, मल्लसिंदूर, मकरध्वज, समीरपन्नग आणि सुवर्णराजवंगेश्वर या रसकल्पांबाबतचे आपल्या चिकित्सेतील अनुभव अत्यंत सुंदर शब्दांत मांडले. सूक्ष्मऔषधी निर्माण या विषयीदेखील सरांनी माहिती दिली.

दुसऱ्या सत्रात वैद्य महेश ठाकूर यांनी रसौषधी रुग्णानुभव या अनुषंगाने सरांच्या नित्य वापरातील जसद भस्म, रसमाणिक्य, प्रवाळ भस्म, सुवर्ण मालिनी वसंत, रससिंदूर, समीरपन्नग या कल्पांवर अभ्यासपूर्ण विवेचन केले.

सत्रांचे संचालन वैद्य नेहा जोशी, वैद्य अपर्णा उत्पात, वैद्य निनाद साडविलकर आणि वैद्य निरंजन गोखले यांनी केले. या परिसंवादाकरिता श्री धूतपापेश्वर प्रा. लि. आणि पुण्यातील आयुर्वेद रसशाळेचे सहकार्य लाभले. परिसंवादाकरिता रत्नागिरी, चिपळूण, खेड, राजापूर, लांजा, दापोली, देवगड, मुंबई अशा विविध ठिकाणांहून १५० वैद्य उपस्थित होते.

वैविध्यपूर्ण व्याख्याने
तृतीय सत्रात वैद्य समीर परांजपे यांनी खरलीय रसायन हा विषय मांडला. रसराज रस हा खरलीय कल्प वापरून उत्तम गुण मिळालेले विविध व्याधींमधील अनुभव व्हिडिओ डॉक्युमेंटेशनद्वारे अतिशय कल्पक पद्धतीने सादर केले. चौथ्या सत्रात वैद्य पार्थ काळे यांनी प्रभावी भस्म कल्पना हा विषय मांडला. लोहभस्म, सुवर्णमाक्षिक भस्म, ताम्र भस्म, मण्डूर भस्म, हिरक भस्म यांच्या निर्माण प्रक्रिया आणि उपयोग, तसेच पारद-लोह संयोग यासारख्या वैविध्यपूर्ण कल्पना यावर सखोल भाष्य केले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:24 14-02-2025