लांजा : शिपोशी shiposhi प्राथमिक आरोग्य केंद्राच्या शासकीय निवासस्थानी आरडाओरडा करत निवासस्थानाचा दरवाजा लाथेने तोडून पत्नीला शिवीगाळ व मारहाण केल्याप्रकरणी लांजा पोलिसांनी नवर्यावर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना १ ऑक्टोबर रोजी दुपारी २.३० च्या सुमारास शिपोशी येथे घडली आहे. याबाबतची तक्रार सुप्रिया एकनाथ यादव (३१ वर्षे, रा. लांजा धावणेवाडी) हिने लांजा पोलीस ठाण्यात दिली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुप्रिया यादव आणि तिचा पती सागर रघुनाथ वावरे (रा. कोल्हापूर) ही दोघे एक वर्षापासून एकमेकांपासून विभक्त राहत आहेत. पत्नी सुप्रिया यादव हिने घटस्फोटाबाबत ऑक्टोबर २०२३ मध्ये रत्नागिरी जिल्हा सत्र न्यायालयात दावा दाखल केला असून त्याबाबतची केस न्यायालयात चालू आहे. सुप्रिया यादव ही शिपोशी प्राथमिक आरोग्य केंद्रात नर्स म्हणून कार्यरत आहेत. मंगळवार दि. १ ऑक्टोबर रोजी दुपारी २.३० च्या सुमारास पती सागर वावरे याने प्राथमिक आरोग्य केंद्र शिपोशी येथे जावून पत्नी सुप्रिया हिच्यावर संशय घेत प्राथमिक आरोग्य केंद्र शिपोशीच्या शासकीय निवासस्थानी येवून आरडाओडा करून निवासस्थानाचा दरवाजा लाथेने तोडून नुकसान केले. त्याचप्रमाणे पत्नी सुप्रिया हिला हाताच्या थाटाने मारहाण करून शिवीगाळ आणि दमदाटी केली.
याप्रकरणी लांजा पोलीस ठाण्यात पती सागर वावरे याच्या विरोधात भारतीय न्याय संहिता कलम ११५ (२), ३५२, ३५१ (२), सार्वजनिक संपत्तीची हानी प्रतिबंध अधिनियम १९८४ चे कलम ३, महाराष्ट्र दारूबंदी कायदा १९४९ चे कलम ८५ (१), (२), महाराष्ट्र पोलीस कायदा १९५१ चे कलम ११० / ११७ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, याबाबत अधिक तपास लांजा पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड. कॉन्स्टे. सचिन भुजबळराव हे करत आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:48 03-10-2024