संगमेश्वर : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील आरवली ते बावनदी या ३६ किमी अपघातप्रवण क्षेत्रातील रखडलेल्या सोनवी पुलाचे काम गेली पाच वर्षे रडतखडत सुरू आहे. हे काम नक्की कधी पूर्ण होणार, असा संतप्त सवाल वाहनचालकांनी उपस्थित केला.
राष्ट्रीय महामार्गावरील ब्रिटिशकालीन पूल म्हणून ओळख असलेल्या शास्त्री, सोनवी, बावनदी, आरवली या पुलांची कामे हाती घेण्यात आली होती. पावसाळ्यादरम्यान धोकादायक असलेल्या आरवली, बावनदी आणि शास्त्री या पुलांचे कामे ठेकेदार कंपनीने हाती घेतले होते. पावसाळ्यात पूरजन्य स्थितीत बावनदी आणि शास्त्री हे पूल धोकादायक पातळी ओलांडतात. त्यामुळे महामार्गाची वाहतूक थांबवावी लागते. या पुलांची कामे पूर्ण झाली आहेत; मात्र सोनवी आणि बावनदी पुलाची कामे रखडली आहेत. फेब्रुवारी महिना सुरू झाला तरी अजूनही पुलाचे काम रडतखडत सुरू आहे. त्यामुळे संगमेश्वरवासीयांनी संताप व्यक्त केला.
अनेक वर्षे सोनवी पुलाचे काम अत्यंत संथगतीने सुरू आहे. या पुलाच्या कामामुळे पुलाच्या दोन्ही बाजूला दररोज मोठी वाहतूककोंडी होऊन वाहनचालक आणि पादचाऱ्यांना मनस्ताप होत आहे. पुलाचे काम करणारी ठेकेदार कंपनी सुरक्षेचे कोणतेही उपाय करत नसल्यामुळे धोका अधिक वाढला आहे. राष्ट्रीय महामार्ग विभागाने याची दखल न घेतल्यास आम्हाला आंदोलन करून लक्ष वेधावे लागेल, असे परशुराम पवार यांनी सांगितले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:16 PM 15/Feb/2025














