पावस : चांदा ते बांदा या योजनेंतर्गत श्री येसू अक्का महिला काथ्या प्रक्रिया संस्था यांच्या वेंगुर्ला तालुक्यातील परूळे बाजार येथील काथ्या उद्योग संकलन सुविधा केंद्राला रत्नागिरी तालुक्यातील निर्मल ग्रामपंचायत नाखरे येथील महिला बचतगटाच्या प्रतिनिधी शेतकऱ्यांनी भेट दिली. या प्रकल्पाची माहिती घेत तो प्रकल्प नाखरे गावात राबवण्याचा निर्धार केला.
नाखरे गावात विविध प्रकारची विकासकामे व प्रकल्प शासनस्तरावर राबवली जातात. हे उपक्रम राबवताना इतर ग्रामपंचायतींच्या माध्यमातून वेगळेपणा जपण्याचा प्रयत्न केला जातो. त्या वेगळेपणाचा अभ्यास गावातील ग्रामस्थ व महिलांना राबवता यावा यासाठी ग्रामपंचायत नाखरेतर्फे अभ्यासदौऱ्याचे नियोजन केले होते. वेंगुर्ले तालुक्यातील परूळे बाजार ग्रामपंचायतीने राबवलेल्या काथ्या प्रकल्पाला नाखरे गावातील बचतगट महिला प्रतिनिधी, शेतकरी व शासकीय अधिकारी अशा शंभर लोकांनी भेट दिली.
या वेळी परूळे बाजार ग्रामपंचायतीचे माजी सरपंच व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य प्रदीप प्रभू यांनी या प्रकल्पाची माहिती दिली. परूळे गावांमध्ये मोठ्या प्रमाणात नारळाची झाडे लावण्यात आली आहेत. त्या माध्यमातून नारळाचे उत्पन्न घेतले जाते. या स्थितीत त्या नारळापासून विभक्त करण्यात आलेल्या सोडणाचा उपयोग करून रोजगार निर्मिती व्हावी या दृष्टिकोनातून चांदा ते बांदा या योजनेंतर्गत शंभर महिलांना एकत्र करून तिथे संकलन सुविधा केंद्र सुरू केले आहे. त्या माध्यमातून गावातील स्मशानभूमीच्या जवळ असलेल्या जागेत हे केंद्र उभारण्यात आले आहे. या सोडण्यापासून काथ्या, कोकोपीट, रस्सी तसेच पायपुसणीपासून अनेक वस्तूंची निर्मिती केली जाते. त्यामुळे गावातील महिलांना गावातच रोजगार उपलब्ध झाला आहे.
टाकाऊपासून सोने करण्याची संधी या महिलांना प्राप्त झाल्यामुळे या उद्योगाला परिसरात चांगली मागणी आहे. या वेळी गावातील बचतगटाच्या महिला, शेतकरी, अंगणवाडी शिक्षिका, मदतनीस, महिला कृषी सहाय्यक, ग्रामपंचायत सदस्य व अन्य क्षेत्रातील पदाधिकारी अशा शंभर लोकांनी या अभ्यासदौऱ्याचा लाभघेतला आणि बचतगटाच्या माध्यमातून तयार करण्यात आलेल्या प्रकल्पाचा आदर्श घेऊन तो राबवण्याचा संकल्प करण्यात आला.
हा प्रकल्प चांगल्या प्रकारे कार्यान्वित केला असून, तो आदर्शवत आहे. नाखरे परिसरात नारळाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. त्याचा उपयोग केला गेला, तर गावातील महिलांना रोजगार संधी निर्माण होईल. या अभ्यासदौऱ्याचा हेतू आम्ही साध्य करू आणि परूळे गावाप्रमाणे नाखरे गावात एक चांगला प्रकल्प राबवू, जेणेकरून गावातील महिलांना रोजगाराचे व्यासपीठ निर्माण होईल. विजय चव्हाण, उपसरपंच, नाखरे
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:43 PM 15/Feb/2025














