Guhagar : वरचापाट रस्ता रुंदीकरणाचा विषय अनिर्णीत

गुहागर : रस्त्याची रुंदी कमी करणे, ठरावीक ठिकाणचे आरक्षण उठवणे याबाबत हरकती घेऊन केलेल्या बदलाला प्रधान सचिवांनी अद्यापही सहमती दिलेली नाही. यामुळे हे तिन्ही विषय राखून ठेवण्यात आले असून, सुनावणीचा अहवाल आल्यानंतर पुन्हा यावर योग्य तो पर्याय सुचवण्यात येईल, अशी माहिती गुहागर Guhagar नगर पंचायतीचे मुख्याधिकारी स्वप्निल चव्हाण यांनी दिली.

गुहागर नगरपंचायतीच्या विकास आराखड्याबाबत १५०० च्या वरती हरकती दाखल झाल्या होत्या. यामध्ये मुख्य म्हणजे गुहागर शहर वरचापाट मार्ग हा १९ मीटर रुंदीचा दाखवण्यात आला होता. तो ९ मीटरपर्यंत करण्यात यावा, अशी मागणी वरचापाट ग्रामस्थांनी केली होती. या मागणीप्रमाणे सुधारित विकास आराखड्यामध्ये बदल करण्यात आला होता. दरम्यान, शुक्रवारी नगरविकास विभागाचे प्रधान सचिव आसिमकुमार गुप्ता यांच्या प्रमुख उपस्थितीत अंतिम सुनावणी घेण्यात आली. यावेळी गुहागर नगर पंचायतीचे मुख्याधिकारी स्वप्निल चव्हाण, नगररचनाकार विभागाचे निखिल पाटील तसेच संचालक मंडळ उपस्थित होते. सुनावणीमध्ये बहुतांशी विषयाला सहमती देण्यात आली. संचालक मंडळाने सर्वच विषय मान्य केले. परंतु प्रधान सचिव यांनी वरचापाट परिसरातील पार्किंग व चार्जिंग पॉईंटसाठी आवश्यक शासकीय जागा सूचवावी, असे सांगत तोपर्यंत हा विषय राखीव ठेवण्यात आला आहे. तर वरचापाट येथील रस्ता ९ मीटरवर करावा, अशी गुहागर नगरपंचायतीच्या वतीने केलेली विनंतीलाही प्रलंबित ठेवण्यात आले आहे. क्रीडा संकुल यावरच्याही बदललेल्या आरक्षणाबाबत निर्णय अनिर्णीत ठेवला आहे. सध्या शहरातून दाखविलेल्या कोस्टल हायवेचे रेखांकनही तसेच ठेवण्यात आले आहे. यामुळे हे सर्व विषय प्रधान सचिवांकडे प्रलंबित असून, सुनावणीच्या अंतिम निर्णयाकडे लक्ष लागले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:01 PM 03/Oct/2024