रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गावरील हातखंबा तिठा येथे दुचाकीवरून रत्नागिरीकडे दाम्पत्य जात होते. यावेळी अचानक यातील दुचाकी चालक पतीचा तोल गेल्याने दोघेही रस्त्यावर पडले. यावेळी त्यांच्या मागून आलेल्या ट्रकची चाके महिलेच्या शरीरावरून गेल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची ही घटना रविवार, १६ रोजी दुपारी २.३० च्या सुमारास घडली.
तैसिरा अमीन हिसब (वय २६, मूळ रा. मुंबई, सध्या रा. वडवली लांजा, रत्नागिरी) असे अपघातात मृत्यू झालेल्या विवाहित महिलेचे नाव आहे.
अमिन हिसब आणि तैसिरा यांचे तीन वर्षांपूर्वी लग्न झाले होते. हिसब दाम्पत्य मुंबईला रहात होते. काही दिवसांपूर्वी हे दाम्पत्य आपल्या गावी वडवली येथे आले होते. रविवारी दुपारी अमिन हा पत्नी तैसिराला आपल्या ताब्यातील दुचाकीवरुन लांजा ते रत्नागिरी असा घेवून येत होता. त्यांची दुचाकी हातखंबा तिठा येथून जात असताना त्यांच्या दुचाकीच्या पाठीमागून एक ट्रक येत होता. याचवेळी हा ट्रक या दुचाकीच्या जवळ आल्याने अमिनचा तेथील रस्त्याच्या कामामुळे दुचाकीवरील ताबा सुटून दोघेही रस्त्यावर कोसळले.
अपघातानंतर तैसिरा रस्त्यावरुन उठेपर्यंत मागून येणाऱ्या ट्रकची चाके तिच्या हातावरुन गेल्याने ती गंभीर जखमी झाल्याने तिचा जागीच मृत्यू झाला होता. तेथील ग्रामस्थांनी दोघांनाही रिक्षा टेम्पोने तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. या अपघाताची माहिती मिळताच ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी तसेच रुग्णालयात धाव घेत अपघाताचा पंचनामा केला. सायंकाळी उशिरापर्यंत या अपघाताची नोंद करण्याची कार्यवाही सुरु होती.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:20 AM 17/Feb/2025














