चिपळूण : मला पक्षाकडून कोणतेतरी मोठे पद मिळावे, या दबावासाठी आजपर्यंत माझ्या ४३ वर्षांच्या राजकीय प्रवासात कधीही नौटंकी, नाटक किंवा रडगाणे केलेले नाही. मला जे मिळाले व नाही मिळाले ते माझ्या नशिबाने. जे असेल ते सत्य या विचाराने मी राजकीय प्रवास सुरू ठेवला आहे. माझ्यात काही राजकीय दोष आहेत. मात्र, मी कधी खोटे बोलत नाही.
दिलेली वेळ आणि शब्द पाळतो. कोणाला चांगले वाटावे म्हणून खूष करण्यासाठी लांगुलचालन करीत नाहीत. यासाठी खोटे बोलत नाही. खरं काय तेच बोलतो. असे असताना पद मिळावे म्हणून पक्षावर दबावासाठी मला संधी मिळाली नाही, असा जो काय माझ्या बाबतीत गैरसमज निर्माण केला आहे तो चुकीचा असून मी असे कुठलही शब्द वापरले नसल्याचे स्पष्टीकरण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार भास्कर जाधव यांनी रविवारी (दि. १६) पत्रकार परिषदेत दिले.
गेल्या काही दिवसांपासून कोकणात मिशन टायगरचे राजकीय वादळ सुरू झाले आहे. प्रामुख्याने शिवसेना उबाठा गटातील अनेक माजी लोकप्रतिनिधी व पदाधिकारी शिंदे शिवसेनेत प्रवेश करीत आहेत.
या पार्श्वभूमीवर काही माध्यमांतून मिशन टायगरचा सूर पकडून आ. जाधव यांच्या राजकीय हालचालींवर लक्ष ठेवून त्यांच्या प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केला. या प्रतिक्रियेतून आ. जाधव हे संघटनेत नाराज असल्याची चर्चा सुरू झाली. ही चर्चा त्यांच्या प्रतिक्रियेच्या काही मुद्द्यांतून मोठ्या प्रमाणात वाऱ्यासारखी पसरू लागली. त्या चर्चेला पूर्णविराम देण्यासाठी व मुद्द्यांचा सविस्तर खुलासा करण्यासाठी आ. जाधव यांनी आज माध्यमांसमोर सर्वच मुद्द्यांचा खुलासा केला.
ते म्हणाले, पक्षाने मला संधी दिली नाही, असे मी कधीच म्हणालो नाही. मी राजकारणात वावरत असताना मला गेल्या ४२ वर्षांत कामाची पाहिजे तशी संधी मिळाली नाही, अशी भावना व्यक्त करताना मी कुठलाही पक्ष, नेता याचा उल्लेख केलेला नाही.
मात्र, माझ्या ४३ वर्षांच्या राजकीय कारकिर्दीत मला योग्य संधी मिळाली नसल्याचे दुर्दैव व दोष माझे आहेत. परंतु त्याचा वेगळाच सूर व अर्थ लावून मी नाराज असल्याच्या राजकीय चर्चा सुरू झाल्या आहेत, असे स्पष्टीकरण देताना ठाकरे शिवसेनेतील पक्ष संघटना सोडून गेलेल्या काही माजी लोकप्रतिनिधी व पदाधिकाऱ्यांबाबत मत व्यक्त करताना ते म्हणाले, सध्या राज्यातील राजकीय स्थिती अशी आहे की, कोणाला कोणाचीच गरज राहिलेली नाही. म्हणून जे जिथे आहेत त्यांनी तिथेच थांबून संघटनेला गतवैभव निर्माण करण्यासाठी लढावे लागेल.
जे गेले त्यांच्याबद्दल दुःख नाही. जे आले त्याबद्दलही आनंद नाही, असेही आमदार जाधव म्हणाले. माजी आमदार राजन साळवी सोडून गेले म्हणजे सगळे कोकण गेले नाही, असे आमदार जाधव यावेळी म्हणाले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:24 AM 17/Feb/2025














