दापोली : राष्ट्रवादीतून उबाठामध्ये गेलेल्या सात नगरसेवकांपैकी पाच नगरसेवकांनी शिंदे गटात येण्याचा निर्णय घेतला आहे. ते आज सोमवारी जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन आपला वेगळा गट स्थापन केल्याचा दावा करणार आहेत. शिवाय १८ फेब्रुवारी रोजी राज्यमंत्री योगेश कदम यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचे वृत्त हाती आले आहे
विधानसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादीच्या नगरसेवकांपैकी साधना बोत्रे वगळून इतर सात नगरसेवकांनी उबाठामध्ये प्रवेश केला होता. मात्र विधानसभा निवडणुकीनंतर यापैकी पाच नगरसेवकांनी आता शिवसेना शिंदे गटात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. आयत्यावेळी दगाफटका नको म्हणून त्यांनी रविवारी रात्रीच या सर्व नगरसेवकांनी दापोली सोडली असून सोमवारी सकाळी ते जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन आपल्या वेगळ्या गटाचा दावा करणार आहेत. १८ फेब्रुवारी रोजी राज्यमंत्री योगेश कदम यांचा वाढदिवस आहे. यानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. यामुळे दापोली नगर पंचायतीमधील राजकीय गणिते पूर्णपणे बदलून जाणार आहेत.














