चिपळूण : येथील वालावलकर रुग्णालयात डायबेटिक रेटीनोपॅथीवरील उपचार शिबिर झाले. डॉ. अनंत भोसले (रेटीना सर्जन) व डॉ. सागर पाटील (नेत्ररोगतज्ज्ञ) यांनी शिबिरातील रुग्णांची तपासणी, उपचार व शस्त्रक्रिया केल्या.
डायबिटीसमध्ये रुग्णांच्या रक्तातील साखरेचे प्रमाण वाढलेले असते. वाढलेल्या साखरेच्या प्रमाणामुळे डोळ्यांच्या पडद्यावर परिणाम होतो. यामध्ये डोळ्यांच्या पडद्यावर नवीन रक्तवाहिन्या तयार होऊ लागतात. या रक्तवाहिन्या चांगल्या प्रतीच्या नसतात.
त्यामुळे त्या रक्तवाहिन्यातून द्रव पडद्यामध्ये झिरपतो. त्यामुळे डोळ्यांच्या पडद्याला सूज येऊ लागते. डोळ्यांच्या पडद्यावर मॅक्युला नावाची जागा असते, जिथे डोळ्यांत येणारे किरण पडतात. त्या जागेलाही सूज येते. त्यामुळे अशा रुग्णांना धुरकट दिसू लागते. तसेच या नवीन तयार झालेल्या रक्तवाहिन्या चांगल्या प्रतीच्या नसल्यामुळे रेटीना पडद्यामध्ये व डोळ्यांच्या व्हिटरस द्रव्यात रक्तस्त्राव होतो, तसेच रेटीना पडदा फाटू लागतो. या शिबिरात याबाबत डायबेटिक रेटीनोपॅथी तपासणी व उपचार करण्यात आले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:27 PM 17/Feb/2025














