Uday Samant : महिला बचतगटांना एसटी बसस्थानकात उत्पादन विक्रीसाठी जागा देणार : पालकमंत्री उदय सामंत

चिपळूण : महिला बचतगटांना सक्षम करणे, त्यांना ताकद देणे यावर जिल्हा नियोजन समिती बैठकीत सर्वांचे एकमत झाले. स्वतःचा मोबाईल असेल, तर बचत गटांची चळवळ वाढविणे सोपी जाईल. त्यामुळे या पुढच्या काळातदेखील महिला बचतगटांना नव्या एसटी बसस्थानकात उत्पादन विक्रीसाठी जागा देणार, असे पालकमंत्री व उद्योगमंत्री उदय सामंत यांनी चिपळुणात सांगितले.

चिपळूण येथील रत्नागिरी जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी पतपेढी सभागृहात उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानामध्ये कार्यरत समुदाय संसाधान व्यक्तींना स्मार्ट मोबाईलचे वितरण पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आ. भास्कर जाधव, आ. शेखर निकम, अपर जिल्हाधिकारी शंकर बर्गे, प्रांताधिकारी आकाश लिगाडे, माजी आ. सदानंद चव्हाण, माजी सभापती शौकत मुकादम आदी उपस्थित होते.

यावेळी पालकमंत्री सामंत म्हणाले, बचतगट चळवळीमध्ये महिलांची आर्थिक उन्नती घडते. त्यासाठी बक्षीस म्हणून मोबाईल वितरण होत आहे. ग्रामसंघांच्या इमारती दिल्या आहेत, महिला बचतगटांनी उत्पादन केलेल्या वस्तूंचे विक्री केंद्र देखील असणार आहे. महिला बचतगटांनी उत्पादने स्वतः तयार केली पाहिजेत. त्याचे मार्केटिंग, पॅकेजिंग करत नाही, तोपर्यंत वस्तूंना मागणी वाढणार नाही. ज्यादिवशी महिलांचे उत्पादन मोठ्या मॉलमध्ये विक्रीस जातील, त्यादिवशी या मोबाईल वितरणाचे सार्थक झाले असे समजू, असे सांगितले. जिल्ह्याच्या विकासाचा निर्णय घेण्याची ज्यावेळी वेळ येते. त्यावेळी आम्ही एकत्र असतो.

राज्यातही जनतेच्या, जिल्ह्याच्या विकासासाठी प्रत्येकांनी एकत्र आले पाहिजे, असा संदेश आजचा कार्यक्रम देईल, असेही पालकमंत्री म्हणाले. आमदार जाधव म्हणाले, सीआरपींना मोबाईल देण्याचा विषय डीपीडीसीमध्ये आला. सर्वांनी त्याला पाठिंबा दिला. त्यासाठी २ कोटी ९६ लाख ४० हजार रुपये निधीची तरतूद करण्यात आली. प्रभाग संघाच्या इमारती मतदार संघात ५ उभे राहणार आहेत. जिल्ह्याच्या विकासात सगळे मिळून एकत्र काम करू.

आ. शेखर निकम म्हणाले, पावसाळ्यामध्ये प्रशासनाने जागृतपणे लक्ष ठेवल्याने चिपळूणमध्ये गंभीर परिस्थिती आली नाही. महिलांच्या पाठीमागे ताकद उभी करण्याचे शासनाचे काम पालकमंत्री महोदयांच्या माध्यमातून होत आहे. त्यातूनच मोबाईल वितरण कार्यक्रम होत आहे.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला दीपप्रज्वलन करण्यात आले. चिपळूण व गुहागरमधील सीआरपीना प्रातिनिधिक स्वरुपात मोबाईलचे वितरण करण्यात आले. यावेळी गुहागर व चिपळूण तालुक्यातील बचतगटातील सीआरपी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. या कार्यक्रमाला सर्व पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:38 PM 03/Oct/2024