राज्याच्या तापमानात आणखी वाढ होणार

पुणे : राज्यात उन्हाच्या झळा वाढल्याने कमाल तापमानाचा पारा ३६ अंशांपार पोहोचला आहे. सोमवारी (ता. १७) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये सोलापूर येथे राज्यातील उच्चांकी ३७.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. राज्याच्या तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

सोमवारी (ता. १७) हरियानाच्या रोहतक येथे देशाच्या सपाट भूभागावरील नीचांकी ८.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर राज्यात निफाड येथील गहू संशोधन केंद्रात राज्यातील नीचांकी आठ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

उर्वरित राज्यात बहुतांश ठिकाणी किमान तापमान १० ते २२ अंशांच्या दरम्यान होते. राज्याच्या कमाल तापमानात वाढ होत असून, रविवारी (ता. १६) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये सोलापूरसह मध्य महाराष्ट्रातील जेऊर, सांगली, मराठवाड्यातील परभणी, विदर्भातील ब्रह्मपुरी, अकोला, नागपूर, चंद्रपूर, वर्धा येथे कमाल तापमान ३६ अंशांवर होते. उन्हाच्या झळा चांगल्याच वाढल्या असून, उकाड्यामुळे घामाच्या धारा वाहू लागल्या आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:19 AM 18/Feb/2025